भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा संभाजी महामुनी दिवे – पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर जगताप काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते. जगता यांनी भाजपमध्ये प्र्वेश केल्यास भाजपला पुरंदरमध्ये मोठी ताकद मिळणार असून राजकीय गणिते पूर्णपणे बदलणार आहेत. दरम्यान, जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास पुरंदरमधील काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. पुरंदर तालुक्यातील काँग्रेस पक्षावर माजी आमदार संजय जगताप यांच्या कुटुंबीयांची मोठी पकड आहे. दिवंगत आमदार चंदुकाका जगताप यांची संपूर्ण हयात काँग्रेसमध्येच गेली. त्यांना पुरंदर विधानसभा निवडणुकीत प्रयत्न करूनही यश मिळविता आले नाही. मात्र, तरीही काँग्रेस वरील त्यांची निष्ठा संपूर्ण हयातभर ठेवली होती. विविध राजकीय पक्षांनी त्यांना पद्धतशीरपणे बगल देण्याचे काम केले. त्यानंतर संजय जगताप यांनीही यापूर्वी सलग दोन निवडणुकीत आमदार विजय शिवतारे यांच्याकडून पराभव पत्करला, मात्र तरीही नाउमेद न होता पक्षावरील निष्ठा कायम ठेवून पक्षात सक्रीय राहिले. 2014 च्या निवडणुकीत माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आले असताना टेकवडे यांचा पराभव दृष्टीक्षेपात होता. तर संजय जगताप निवडून आल्यास डोईजड होतील म्हणून विजय शिवतारे यांना खुलेआम मदत केली. एक जगताप आमदार झाल्यास सर्व जगताप आमदार होतील, त्यामुळे शेवटी विजय आपलाच आहे. या एका वाक्याने जगताप यांचा पराभव झाला आणि शिवतारे निवडून आले. हा इतिहास सर्वज्ञात आहे. तर 2019 च्या निवडणुकीत महाविकास आघाडी असतानाही संजय जगताप यांच्या प्रचारास येण्यास शरद पवार यांनी जाणीवपूर्वक टाळले. दरम्यानच्या काळात विजय शिवतारे निवडून आल्यानंतर त्यांनी पवार कुटुंबीयांवर टीकेची अक्षरशः झोड उठवली होती. आणि त्यांना रोखणे आवश्यक असल्याने स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगताप यांच्या प्रचारात उडी घेतली आणि संजय जगताप निवडून आले. 2024 च्या निवडणुकीत संजय जगताप यांना पुन्हा निवडून येण्याची संधी होती;मात्र शेवटच्या क्षणी अजित पवार यांनी संभाजीराव झेंडे यांना उमेदवारी देवून मतांचे विभाजन करण्यात सरशी केली. त्यामध्ये संजय जगताप यांना मोठा फटका बसला आणि पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेस निराधार होण्याची भीती? पुरंदर काँग्रेसवर जगताप परिवाराची मोठी पकड असून शिवसेनेच्या विरोधात बेलसर माळशिरस गटात दोन पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले होते. सासवड नगरपरिषदेवर अनेक वर्षे एकहाती सत्ता असून राष्ट्रवादीतील गटबाजीचा फायदा घेत जेजुरी नगरपरिषद मागील पंचवार्षिक निवडणुकीत ताब्यात घेण्यात यश मिळवले होते. सहकार, शैक्षणिक, उद्योग यामध्ये त्यांची मोठी पकड असल्याने अनेक गावच्या विकास सोसाट्याचा, ग्रामपंचायती, दूधसंघ, नीरा बाजार समिती, खरेदी-विक्री संघ यावर त्यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे जगताप यांच्या सोबतच संपूर्ण पक्षच भाजपला मिळणार आहे. याचा थेट परिणाम काँग्रेसवर होणार असून तालुक्यातील काँग्रेस पक्षच निराधार होण्याची भीती आहे. शिवतारे, जगताप वर्चस्ववादाचा दुसरा अंक? सध्या राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती आहे. तसेच तालुक्यात शिवतारे यांना उघडपणे शह देणारे भाजपमध्ये फारसे कोणी उत्सुक नाही; मात्र संजय जगताप भाजपमध्ये आल्यास शिवतारे यांना मोठा शह बसणार आहे. येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुका येत असून संजय जगताप यांच्या माध्यमातून अनेक वर्षे पुरंदर तालुक्यात सत्तेची स्वप्ने पाहणार्या भाजपला त्याचा फायदा होणार आहे. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपला जगताप यांच्या मदतीने प्रवेश मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. त्याचवेळी महायुतीमधील शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांच्या समोर भाजपचे अंतर्गत आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे संजय जगताप आणि विजय शिवतारे यांच्यातील राजकीय वर्चस्ववादाचा दुसरा अंक लवकरच पाहायला मिळणार अशी चर्चा सध्या रंगली आहे.