Pune District : सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

पुरंदवडे येथे आज पहिले गोल रिंगण रंगणार
नातेपुते –आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे भक्तिमय वातावरणात आगमन झाले.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचे स्वागत करून माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सकाळी 10 वाजता धर्मपुरी येथे पालखीचे आगमन झाले.
यापूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली माऊलींच्या पालखीला भक्तीपूर्ण निरोप दिला. ’टाळी वाजवावी, गुढी उभी रहावी’ या संतवचनानुसार टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी ’जय हरि विठ्ठल, ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करीत पंढरीच्या दिशेने निघाले. त्यानंतर आज नातेपुते मुक्कामी पालखी सोहळा विसावला. उद्या (दि. 1) माळशिरस मुक्कामाच्या आधी पुरंदवडे येथे पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण होणार आहे.
धर्मपुरीत पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. येथील विसाव्यानंतर पालखी नातेपुते येथे मुक्कामासाठी मार्गस्थ झाली. ग्रामविकास विभागाने वारकरी सेवा मसाज केंद्र, वैद्यकीय कक्ष, हिरकणी कक्ष, मुख्यमंत्री आरोग्य रथ, मोफत मोबाईल चार्जिंग पॉईंट, 108 अॅम्ब्युलन्स सेवांचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. सोलापूर जिल्हा परिषदेने आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण रक्षण यांवर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहेत.





