Pune District : श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी

थेऊर – तब्बल 21 वर्षानंतर अंगारकी चतुर्थी आणि श्रावण महिन्याचा योग आला असल्याने हवेली तालुक्यातील थेऊर येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती.
आज पहाटे श्री चिंतामणीचे पुजारी अजय आगलावे यांनी श्रींची महापूजा केली. त्यानंतर चिंचवड देवस्थान ट्रस्टचे वतीने पूजा करण्यात आली यावेळी विश्वस्त केशव विद्वांस उपस्थित होते. देवस्थानच्या वतीने गणेश भक्तांना दर्शन घेणे सुखकर व्हावे, यासाठी मंदिर प्रांगण आणि मंदिराबाहेर मांडव घालण्यात आले होते. दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि दर्पण ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
भाविकांनी मोठ्या प्रमाणात शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करण्याचे श्रेष्ठ कार्य केले. दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली. सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळ यांचे साथीने हभप उगले (महाराज) आळंदी देवाची यांचे कीर्तन झाले. चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना निघला त्यानंतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद देण्यात आला. जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र यांनी 1 अधिकारी 10 कर्मचारी, 10 होमगार्ड तर देवस्थानच्या वतीने 9 जण अशी सुरक्षा व्यवस्था लावली होती. त्यामुळे कसलाही अनुचित प्रकार घडला नाही.
तसेच ग्रामपंचायती तर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारच्या वेळी थेऊरकडे जाणार्या दत्तनगर परिसरात एक अवजड ट्रक इंजिन नादुरुस्त झाल्याने बंद पडला. त्यामुळे सुमारे दोन ते तीन तास वहातुक कोंडी झाली होती. यामुळे श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना तसेच पुणे-सोलापूर व पुणे-नगर महामार्गाकडे ये-जा करत असलेल्या प्रवाशांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागले. वहातुक विभागाचे कर्मचारी तेथे पोहोचले नंतर ट्रेनच्या सहाय्याने ट्रक तेथून बाजूला घेतलेनंतर वाहतूक सुरळीत झाली.





