Pune District : भर पावसात भाविकांची माऊली मंदिरात अलोट गर्दी

– सायंकाळी श्रींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा उत्साहात
आळंदी – पंधरा दिवसांपूर्वी माऊली विठू भेटीसाठी पंढरीकडे गेली, आज देवशयनी आषाढी एकादशी असल्याने पहाटेपासूनच वरुण राजाची रिपरिप सुरू होती. माऊलींच्या भेटीची आस लागलेले भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून आज येथे येऊन दाखल झाले होते. पहाटे चार वाजल्यापासून तर रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांनी माऊलींचा दर्शनार्थ एकच गर्दी केली होती.
माऊली मंदिरात नित्याचे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले, दुपारी साडेबारा वाजता माऊलींना महानैवेद्य देण्यात आला. सायंकाळी साडेपाच वाजता माऊलींची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी निघाली यावेळी आळंदीकर नागरिक, खांदेकरी, मानकरी व भाविक नगर प्रदक्षिणेमध्ये सहभागी झाले होते. ठिकठिकाणी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी भाविक व नागरिक गर्दी करत होते.
सायंकाळी ठीक सहा वाजता माऊलींची पालखी येथील ग्रामदैवत असणाऱ्या हजेरी मारुती मंदिरात काही काळ विसावली तेथे भजन व आरती होऊन, पालखी पुन्हा रात्री मंदिरामध्ये विसावली. आज संपूर्ण दिवसभर वरुण राजाची हजेरी कायम होती. अशाही परिस्थितीत भाविकांचा ओघ काही कमी होताना दिसत नव्हता.
आषाढी एकादशीनिमित्त लाखोंच्यावर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. आळंदी देवाची पोलीस स्टेशन तसेच दिघी वाहतूक पोलीस यांच्या वतीने अतिशय चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पीएमपीएमएल व खाजगी वाहनाने भाविक अलंकापुरी नगरीत येऊन दाखल होत होते.





