पुणे जिल्हा : नळवणेत श्रींच्या पालखीसमोर भाविक लीन

श्री कुलस्वामी खंडेराय चंपाषष्ठी महोत्सव उत्साहात
बेल्हे – महाराष्ट्राचे कुलदैवत, नळवणे (ता.जुन्नर) गावचे ग्रामदैवत श्री कुलस्वामी खंडेराया मंदिर जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा व 17 वा वर्धापन दिन तथा चंपाषष्ठी सोहळा सोमवारी (दि. 18) भव्य दिव्य स्वरूपात पार पडला. खंडोबाच्या पालखीसमोर भाविक लीन झाले होते.
गडावर सकाळपासून विविध गडावर विविध कार्यक्रम पार पडले. यामध्ये पहाटे श्री मंगलस्नान व महाभिषेक उद्योजक अभिषेक भुजबळ व आळेफाट्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत पालखी मिरवणूक सोहळा यात पारंपरिक वाद्याच्या गजरात श्रींच्या पालखीची गावामधून मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी 12 नंतर ‘श्रीं’ची महाआरती झाली व नंतर नैवेद्य अर्पण करण्यात आला.
तद्नंतर आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12 जागरण, रात्री हरिकीर्तन, भजन व रात्री 10 नंतर शोभेची दारू उडवण्याचा कार्यक्रम संपन्न झाले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाणी, प्रदक्षिणा व दर्शन मार्गावर सावलीची व्यवस्था, सर्व भाविकांना महाप्रसाद,
भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंग अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आळेफाटा पोलिसांच्या वतीने यात्रेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. अशी माहिती श्री कुलस्वामी खंडेराया देवस्थान चे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी दिली.





