पुणे जिल्हा : काटेरी ढिगावर भाविकांच्या उड्या

गुळुंचेत भाविकांचा उत्साह शिगेला डोळ्याचे पारणे फिटले
नीरा – हर भोले.. हर हर.. महादेव…. ज्योतिर्लिंग महाराज की जय…. या गगनभेदी जयघोषात भक्ती आणि शक्तीची प्रेरणा देणाऱ्या श्री. ज्योतिर्लिंगाची काटेबारस यात्रा उत्साहात साजरी झाली. भगवान शिवाप्रती असलेल्या श्रद्धेने बाभळीच्या काटेरी ढिगावर भाविकांनी उड्या घेतल्या. उघड्या अंगाने काटेरी ढिगावर लोळणारे भक्त पाहण्यासाठी राज्यासह परराज्यातील हजारोंच्या संख्येत शिवभक्त उपस्थित होते. यावेळी भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
शुक्रवारी द्वादशीला पहाटे साडेतीन वाजता शिवभक्तांनी मंदिरा शेजारी अंघोळ करून गावाबाहेरील मानाच्या काठीचे दर्शन घेऊन मंदिरापर्यंत दंडवत घातले. गुळुंचेसह बारा वाड्यातील ग्रामस्थांनी ग्रामदैवतास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. मानकऱ्यांनी व नवस फेडणाऱ्यांनी मुख्य कळसावर दस बांधले. साडेदहा वाजता ढोलांचे पूजन झाले. भक्तांनी मुक्तपणे गुलाल – खोबऱ्याची उधळण करत हर भोला हर… महादेवाची गर्जना केली.
बाराच्या सुमारास मंदिरातून उत्सव मूर्तीसह दोन्ही पालख्या गावाबाहेरील काठीच्या भेटीसाठी वाजत गाजत निघाल्या. यावेळी छबिन्यात आडवा डाव खेळला. पालख्यांनी काठीला प्रदक्षिणा घालुन आरती झाली. दरम्यान साडेबारा वाजता मंदिरासमोर मानकऱ्यांनी डोक्यावर बाभळीच्या काट्यांच्या फास जमा केले. काटेरी फास गोलाकार पद्धतीने मांडले गेले.
गायकवाड परिवारातील सदस्यांनी काट्यांचे पूजन केले. दोन्ही पालख्या मंदिराकडे मार्गस्थ झाल्या, दुपारी एक ते तीन या दोन तासात 240 भक्तांनी काट्याच्या ढिगांवर मनसोक्तपणे लोळण घेतली. काही भक्तांनी पाच ते सात उड्या घेतल्या. मानाची शेवटच्या भक्ताने उडी मारल्यानंतर काटेरी फास जाळून टाकण्यात आले. यात्रेची सांगता त्रिपुरा पौर्णिमेला दीपक लावून होणार आहे.





