Pune District : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणारे भाविक हैराण

तळेघर ते म्हतारबाचीवाडी-निगडाळे रस्त्यावर खड्डे
मंचर – आदिवासी भागात पडत असलेल्या संततधार पावसामुळे श्रीक्षेत्र भीमाशंकर या रस्त्यावरील तळेघर ते म्हतारबाचीवाडी-निगडाळे या 15 किलोमीटर रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणार्या भाविकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते. भीमाशंकर येथे भाविकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ दुरुस्त करावा. अशी मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिक करीत आहेत.
श्री क्षेत्र भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी देश व राज्यभरातून भाविक येत असतात. विशेषतः शनिवार, रविवार आणि सोमवार याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गेले अनेक वर्ष याठिकाणी रस्त्याचे नव्याने डांबरीकरण झालेले नाही. दरवर्षी या रस्त्यावर तात्पुरती डागडुजी करण्यात येते. याकरिता लाखो रुपये खर्च होतात. यंदा मे महिन्यात पाऊस सुरू झाल्याने तळेघर ते म्हतारबाचीवाडी-निगडाळे रस्त्यावर खड्डे पडायला सुरूवात झाली आहे. याभागात रस्ते दर्जेदार कधी होणार? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. तसेच या रस्त्यावर दिशादर्शक फलकांचा अभाव असून दाट धुके असल्याने येथे रिफ्लेक्टरची गरज आहे.
पावसामुळे रस्त्याच्या कडेला झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे समोरून येणार्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होत आहे. रस्त्याच्या कडेची गटारे बुजल्याने कायम रस्त्यावर पाणी वाहत असते. यामुळे साइडपट्ट्या वाहून गेल्याने या रस्त्यावर वाहन चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराच्या वतीने याची दखल घेऊन मातीमिश्रित लाल मुरूमाचा वापर न करता आधुनिक तंत्रज्ञान साधनाचा वापर करून येथील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून येथील रस्ते खड्डेमुक्त करावे, अशी मागणी भाविकभक्त, वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.





