अॅड. सर्जेराव पानसरे : स्व. साहेबराव बुट्टेपाटील यांना राजगुरूनगरात अभिवादन राजगुरूनगर – स्व. साहेबराव बुट्टेपाटील आमदार असताना त्यांनी शेतकर्यांसाठी चासकमान धरण आणि विद्यार्थ्यांसाठी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या रूपाने शाश्वत विकासाचा पाया भक्कम केला. त्यांचे संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित होते अशी भावना ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सर्जेराव पानसरे यांनी व्यक्त केली. साहेबराव बुट्टेपाटील यांच्या 24 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी आमदार बाबाजी काळे, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा अॅड. राजमाला बुट्टेपाटील, संचालक बाळासाहेब सांडभोर, हिरामण सातकर, डॉ. प्रकाश चौधरी, प्राचार्य डॉ. एस.एस. पिंगळे, डॉ. एच. एम. जरे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. अॅड. सर्जेराव पानसरे म्हणाले की, साहेबराव बुट्टेपाटील यांच्या जीवन कर्तृत्वाला उजाळा दिला. त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वच्छ, प्रामाणिक, चारित्र्यसंपन्न होते. त्यांना वक्तृत्वाची देणगी लाभलेली होती त्यामुळे समाज त्यांच्याशी जोडला गेला होता. चासकमान धरणाच्या भूमिपूजनप्रसंगी धरणग्रस्तांची बाजू मांडताना त्यांनी खणाला खण आणि फणाला फण मिळाला पाहिजे अशी आग्रहाची भूमिका मांडली. त्यांनी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या रुपाने ज्ञानमंदिर उभे केले, ज्याचा लाभ तालुक्यातील डोंगरी आदिवासी भागातील हजारो विद्यार्थ्यांना झाला. साहेबराव बुट्टेपाटील यांनी शेती आणि शिक्षणाचे जे काम उभे केले. त्यातून ते कायम आपल्याबरोबर राहतील असा विश्वास अॅड. पानसरे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी काजल वाळुंज, दिव्या पिंगळे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. स्मृतिदिनानिमित्त क्रीडाज्योत, एनसीपी पथकाकडून मानवंदना, सर्वधर्मीय प्रार्थना, विज्ञान प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, सरस्वती पूत्र या भीत्तिपत्रकाचे अनावरण आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 78 रक्तदात्यांनी रक्तदान केले. पुण्याच्या ससून रक्तपेढीचे समाजसेवा अधीक्षक अरूण बर्डे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुरेश सावंत, ममता राठोड सहभागी झाले. सूत्रसंचालन प्रा. मच्छिंद्र मुळूक यांनी केले.