पुणे जिल्हा : जुन्नर शहरात 52 कोटींची विकासकामे

आमदार बेनके : लोकहिताची कामे करणार्यांच्या मागे उभे राहा
जुन्नर – राज्यातील महायुती शासनाकडे पाठपुरावा करून जुन्नर शहराकरिता आत्तापर्यंत 52 कोटींची विविध विकासकामे मंजूर केलेली आहेत. या पुढील काळात नागरिकांच्या मागणीनुसार विकासकामे करण्यात येणार आहेत. लोकहिताची कामे करणार्या लोकप्रतिनिधींच्या मागे हिंदू-मुस्लीम समाजबांधवांनी भक्कमपणे उभे राहण्याची गरज असल्याचे मत आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले.
जुन्नर नगरपरिषद हद्दीतील कल्याण पेठ, बोचरे आळी येथील सिमेंट रस्ता भूमिपूजन समारंभानंतर आयोजित कार्यक्रमात आमदार बेनके बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष शाम पांडे, भाऊ कुंभार, धनेश संचेती, धनराज खोत, आनंद परदेशी, सुमीत परदेशी, भरत बोचरे, सागर शिंदे, तुषार लाहोरकर, बिहारीलाल परदेशी, नरेंद्र कासार, विलास कडलक, अन्वर सय्यद आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष शाम पांडे म्हणाले की, आमदार अतुल बेनके यांनी जुन्नरमध्ये विकासकामे करीत असताना पक्षीय राजकारण न आणता कोणताही भेदभाव न करता सर्वच भागात मोठ्या प्रमाणात शासकीय निधी दिलेला असून अजूनही निधी देणार आहेत. नगरपरिषदेच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी होणारे वीजबिल खर्चात कमी करण्याकरिता सोलर हायमास्ट दिवे मुख्य चौकामध्ये विविध भागात नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार लाहोरकर यांनी तर अन्वर सय्यद यांनी आभार मानले.
पर्यटनासाठी 2 हजार कोटींचा डीपीआर तयार
लोकहिताला बाधा न आणता रचनात्मक पद्धतीने विकास कामे केली जात असताना संबंधित ठेकेदारांनी या कामाचा दर्जा राखलाच पाहिजे. जुन्नर पर्यटन विकास आराखडा बाबतचा 2 हजार कोटींचा डीपीआर तयार करण्यात आला असून येत्या अधिवेशनात यासाठी 100 कोटींची तरतूद होण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार बेनके यांनी सांगितले.





