पुणे जिल्हा : तुम्ही संधी दिली म्हणून विकास करता आला

आमदार दत्तात्रय भरणे : कधीही हाक द्या, मदतीला धावून येईल
इंदापूर – पुढे बोलताना आमदार भरणे म्हणाले, मी तालुक्यातील जनतेचे कामे केलेली आहेत. योगदान आहे, तरी उपकार केले नाहीत. तालुक्यातील जनतेने मला सलग दहा वर्षे संधी दिली. त्यामुळेच मी कामे करू शकलो, आगामी काळात देखील उर्वरित राहिलेला गावागावातील विकास करणार आहे. कधीही हाक द्या हा आमदार मदतीला धावून येईल, असे आश्वासन महायुतीचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिले.
इंदापूर तालुक्यातील रुई गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे उमेदवार, आमदार दत्तात्रय भरणे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे, उद्योजक वसंतराव मोहोळकर, युवक नेते दीपक जाधव, भाजपचे माऊली चवरे, नानासाहेब शेंडे, माऊली बनकर, गजानन वाकसे, माणिक भोंग यांच्यासह भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी युवक नेते दीपक जाधव म्हणाले, आमदार दत्तात्रय भरणे यांनी विकास करत असताना, कोणाची ही जात पाहिली नाही. तालुक्यातील सर्व समाजाचा आमदार म्हणून, विकास करण्याची जबाबदारी आमदार भरणे मामांनी पार पाडली आहे. इथून मागच्या काळात राजकारण वेगळ्या मूडमध्ये होते. परंतु परवा बरेच आपल्या पक्षात प्रवेश झाले, चुकीच्या पद्धतीने विरोधक हा समाज एकत्र आला. तो समाज एकत्र आला, असाच मेसेज फिरवत आहेत. आता समाजात भांडण लावून, पोळी भाजण्याचा कोण प्रयत्न करत असेल, त्याला मताच्या रूपाने मतदारांनी उत्तर द्यावे असे आवाहन दीपक जाधव यांनी केले.
मी सोलापूरचा पालकमंत्री असताना, देवा गुंड पाटील माझ्याकडे भरणेवाडी अंथुर्णे येथे आले, मला तुमच्या नेत्यांनी फसवले आहे. एसपींना एक फोन करा व गुन्हा दाखल करण्यास सांगा; मात्र मी लगेच पाटलांना नकार दिला. आमदार यशवंत मानेही यांच्याबरोबर होते. ते देखील पाटलांना म्हणाले, मामा फोन करणार नव्हते, तुमचा खासगी विषय आहे. तुम्हाला लखलाभ; पण मी हा फोन केला तर, मला झोप लागणार नाही. मी कधीही कुणाचे वाईट केले नाही.
-दत्तात्रय भरणे, उमेदवार महायुती इंदापूर





