पुणे जिल्हा : विकसित भारत संकल्प यात्रेचे अकलूजमध्ये स्वागत

अकलूज : नगरपरिषदेच्या वतीने विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे भारत संकल्प यात्रेचे उत्साहात स्वागत केले. या यात्रेतील डिजीटल स्क्रीनच्या रथाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते-पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, उपमुख्याधिकारी जयसिंह खुळे, डॉ. चिराग व्होरा, डॉ. निखील गांधी, डा. सौरभ गांधी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केला. सरकारच्या विविध योजनांची माहिती एकाच छताखाली असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी अकलूज नगरपरिषदेच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 109 घरकुल, रमाई आवास योजना अंतर्गत 13 घरकुलाचे वाटप शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते केले. मोफत आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत गोल्डन कार्ड योजना, आभा कार्ड योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, आधार कार्ड अपडेट करणे आदी योजना मोफत ठेवल्या होत्या.
माळेवाडी अकलूज सावतामाळी मंदिर परिसरात विकसीत भारत संकल्प यात्रा रथाचे स्वागत केले. यावेळी माजी जि. प. सदस्या सुनंदा फुले, माजी सरपंच जालिंदर फुले, नामदेव गलांडे, भारत फुले, जयदीप एकतपुरे, अरुण खंडागळे उपस्थित होते. सूत्रसंचालन कर अधिकारी राजाराम नरुटे यांनी केले.
यासाठी अकलूज नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर, शहर अभियंता धोंडिराम भगनुरे, कर निरीक्षक बाळासाहेब वाईकर, मिळकत व्यवस्थापक सुनील काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.





