पुणे जिल्हा : देवदत्त निकम यांचा पराभव देवदत्त निकम यांनी केल्याची चर्चा

– मविआच्या हारसाठी अपक्ष उमेदवार ठरला कारणीभूत
मंचर – आंबेगाव शिरूर विधानसभेची निवडणूक अतिशय चुरशीची झाली असून महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम असा सामना या मतदारसंघात रंगला होता. एकूण विजयातील अंतर आणि अपक्ष उमेदवार देवदत्त शिवाजीराव निकम या उमेदवाराला मिळालेली मते पाहता देवदत्त निकम यांचा पराभव देवदत्त निकम यांनी केला, अशी चर्चा रंगू लागली आहे.
आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीच्या वातावरणात पार पडली. सुरुवातीपासूनच अतिशय कमी मताधिक्याने सुरू झालेली ही निवडणूक शेवटपर्यंत रंगतदार स्थितीत होती. पहिल्या फेरीपासून चुरस पाहायला मिळाली. वळसे पाटील यांची आघाडी सुरुवातीपासून वाढत वाढत अकराव्या फेरीपर्यंत ५३०० मतांची झाली. त्यानंतर पुन्हा ही आघाडी कमी होत जाऊन १८ व्या फेरीपर्यंत वळसे पाटील यांची आघाडी ५०० मतांपर्यंत आली. त्यानंतर १९ व २० व्या फेरीत वळसे पाटलांनी आघाडी घेऊन ही निवडणूक १६६१ अशा अतिशय कमी मताधिक्याने जिंकली.
खरं तर ३५ वर्षे या मतदार संघातून वळसे पाटील आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. राज्याच्या राजकारणातही त्यांचा मोठा दबदबा आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील त्यांचं मोठं काम आहे. परंतु स्थानिक पातळीवर वळसे पाटील आणि जनता यांच्यामधील कुठेतरी दुरावा निर्माण झाल्याचे व त्यातूनच उमेदवार देवदत्त निकम यांनी जनमानसात संपर्क साधून आपली ओळख निर्माण केली. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल, अशी पहिल्यापासूनच शक्यता होती. या निवडणुकीमध्ये देवदत्त निकम यांच्या नाम साधर्म्य असलेले अपक्ष देवदत्त शिवाजीराव निकम हेही उमेदवार म्हणून उभे होते. त्यांना मिळालेले २९५५ मध्ये वळसे पाटील यांच्या विजयाच्या निर्णयासाठी पूरक ठरली.
देवदत्त जयंतराव निकम यांचा वळसे पाटील यांच्याकडून १६६१ मतांनी पराभव झाला. तर दुसरीकडे देवदत्त शिवाजीराव निकम या अपक्ष उमेदवाराने २९५५ मते मिळवली. त्यामुळे एकंदरीतच अपक्ष देवदत्त निकम यांना पडलेली मते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे देवदत्त जयवंतराव निकम यांना पडणारी होती, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते यांचा आहे. त्यामुळे एकंदरीतच परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार देवदत्त जयवंतराव निकम यांच्या पराभवात अपक्ष देवदत्त शिवाजीराव निकम यांचा वाटा असून देवदत्त निकम यांचा पराभव देवदत्त निकम यांच्यामुळे झाला अशी चर्चा सध्या तालुक्यात रंगू लागली आहे.
मंचर, अवसरीची फेरी ठरली निर्णायक
आंबेगाव शिरूर संघाची मतमोजणी सुरू झाली. यावेळी सुरुवातीला पश्चिम आदिवासी भागात निकम यांना आघाडी मिळाली होती.मात्र, घोडेगाव परिसरात वळसे पाटील यांना आघाडी मिळाली. मंचर व अवसरी खुर्द परिसरात दिलीप वळसे पाटील यांना मिळालेली आघाडी निर्णायक ठरली. रांजणी वळती नागापूर परिसरात निकम हे आघाडीवर राहिले.निरगुडसर येथे वळसे पाटील आघाडीवर राहिले.तरीही शिरूर तालुक्यात निकम हे मोठ्या मताधिक्याने आघाडीवर जातील, अशी शक्यता होती. परंतु तसे झाले नाही.येथे निकम यांना आघाडी मिळाली पण ती कमी होती. निर्णायक आघाडी मिळवण्यात निकम यांना अपयश आल. त्यांनी पाबळ केंदुर परिसरात आघाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु रांजणगाव परिसरात मिळालेल्या आघाडीने वळसे पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.





