पुणे जिल्हा : पारगावात कांदा ओतून निदर्शने

दूध उत्पादक शेतकरी संतापले
पारगाव – दौंड तालुक्यातील पारगाव येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी शिरूर सातारा रोडवर दूध व कांदे ओतून शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
काही काळ रस्ता अडवून दूध व कांदे रस्त्यावर ओतून उपस्थित मंडल अधिकारी परदेशी व गावकामगर तलाठी रामकृष्ण वेताळ यांना निवेदन देण्यात आले.
शेतीसाठी १२ तास विनाखंडित वीजपुरवठा झाला पाहिजे, कांदा निर्यातबंदी उठवण्यात यावी, प्रति लिटर विनाअट ४० रुपये दूध दरवाढ करण्यात यावी, साखर करखान्यावरील इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवण्यात यावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे, दौंड तालुका पंचायत समिती माजी उपसभापती सयाजी ताकवणे, काका तापकीर, सरपंच वाळकी, माजी सरपंच रा. वि. शिशुपाल, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष महेश ताकवले, ऑडिटर दत्तात्रय अल्हाट यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन विश्वास ताकवणे यांनी केले. सरपंच सुभाष बोत्रे यांनी आभार मानले. यावेळी दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





