Pune District : जातेगाव बुद्रुकला चासकमानचे पाणी सोडा शेतकऱ्यांची मागणी ; भूजल पातळी खालावली

शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील गावाला पाणीपुरवठा करणारी विहिर तळ गाठल्याने विंधन विहिरींची देखील पाणीपातळी खालावली असल्याने पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. जातेगाव बुद्रुक गावातील ओढा व नदीला चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी ग्रामपंचायतच्या वतीने केली आहे.
जातेगाव बुद्रुक येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीसह सर्व विंधन विहिरींनी तळ गाठला असल्याने नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
जनावरांच्या पाण्याचा आणि शेतातील पिकांचा प्रश्न गंभीर होत चालला असताना चासकमानचे पाणी ओढ्याला मिळाले तर गावातील पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने हा ओढा व नदीला चासकमान चारी क्रमांक ११ व ११ अमधून पाणी सोडण्याची मागणी सरपंच निलेश उमाप, डॉ. अविनाश कामठे, सुनील वारे, दिगंबर कामठे यांनी चासकमान विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ यांना निवेदन देत केली आहे.
यावेळी ग्रामस्थांच्या निवेदनाचा विचार करता लवकरच पाणी सोडण्याबाबत नियोजन केले जाईल, असे आश्वासन चासकमान विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ यांनी दिले आहे.





