पुणे जिल्हा : निवडणुकीमुळे जेसीबी, क्रेनला वाढली मागणी

नेत्याच्या स्वागतासाठी क्रेन हार, जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्याचा पायंडा
लोणी देवकर – सध्या इंदापूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. तिरंगी लढत असल्यामुळे इंदापूर विधानसभा लढतीमध्ये रंग चढला आहे.
यामध्ये प्रामुख्याने आपल्या नेत्याचे स्वागत करण्यासाठी हलगी, फटाके आदींसह नवीन क्रेन हार आणि जेसीबी मधून पुष्पवृष्टी चा नवीन पायंडा पडला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील जेसीबी आणि क्रेन चालकांना मागणी वाढल्यामुळे चांगले दिवस आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
इंदापूर तालुक्यातील कृषी आणि औदयोगिक क्षेत्र मोठे आहे. त्या प्रमाणात तालुक्यातील जेसीबी आणि क्रेन चालकांना पाहिजे त्या प्रमाणात कामांची कमतरता होती; मात्र लोकसभा निवडणुकांपासून क्रेन हार आणि जेसीबी मधून पुष्पवृष्टी चा नवीन पायंडा पडल्याने क्रेन जेसीबी व्यावसायिकांना चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे.
आपल्या नेत्याला क्रेन हार घालण्यासाठी सरासरी 10 हजार रुपये तर जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यासाठी ताशी 1 हजार रुपये असा दर मिळत असल्याचे क्रेन जेसीबी व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे एकंदरीतच बदललेल्या पायांड्यामुळे क्रेन जेसीबी व्यावसायिकांना चांगले दिवस आले आहेत.





