Pune District : मजूर टंचाईमुळे हार्वेस्टरला मागणी; लहरी वातावरणामुळे वाल्ह्यात बळीराजा त्रस्त

वाल्हे : पुरंदर तालुक्यातील वाल्हे परिसरात गहू काढणीस सुरूवात झाली असून मजूर टंचाईमुळे हार्वेस्टरला मागणी वाढत आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होत आहेत.
यावर्षी कमी पाऊस तसेच वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम शेतीवर आणि पर्यायाने पिकांवर होत असल्याने वाल्हे परिसरातील शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. मागील काही दिवसांपासून दिवसेंदिवस उष्णतेमध्ये वाढ होत आहे. पुढील काही दिवस ही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविला असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
रब्बी हंगामात गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने शेतकरीवर्गाकडून गहू पिकाला पसंती दिली आहे. सध्या पिके काढणीच्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी काढणीस सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्यात गव्हाच्या काढणीला आणखी वेग येईल. पुरंदर तालुक्यात मागील आठवड्यापासून सकाळ पासूनच कडाक्यांचे ऊन पडत असून दुपारनंतर ढगाळ वातावरण होत असून यामुळे शेतक-यांच्या जीवाची घालमेल होत आहे.
सध्या अनेक भागात कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान तर पहाटे थंडी यामुळे गहू, कांदा, मका पिकांना फटका बसत आहे.दिवसभर रानात राबून समाधानकारक रोजगार मिळत नाही. मात्र, औद्योगिक वसाहतीत आठ तास काम केल्यावर 400 ते 500 रुपये रोजंदारी सहज मिळत असल्याने रानात दिवसभर उन्हातान्हात काम करून 200 ते 250 रूपये मिळतात. यामुळे परिसरातील अनेकजण औद्योगिक वसाहतीत कामाला जात असून शेतात काम करण्यासाठी मजूर टंचाई निर्माण होत आहे.





