पुणे जिल्हा : रेल्वेची दिरंगाई; वैष्णवांची वाट आडवी

पालखी सोहळ्याच्या तोंडावर वाल्ह्यात भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात
समीर भुजबळ
वाल्हे : करोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा माऊलींची पालखी मोठ्या दिमाखात पंढरपूरकडे जाणार आहे; मात्र या पालखी सोहळ्यातील वैष्णवांची वाट रेल्वे विभागाची दिरंगाई आडवणार असल्याची स्थिती वाल्हे (ता. पुरंदर) येथे निर्माण झाली असल्याने स्थानिक नागरिक रेल्वे विभागाच्या कामावर कमालीचे नाराज झाले आहेत.
वैष्णवांचा मेळा वाल्हे नगरीत सोमवारी (दि.27) विसावणार आहे. त्यांना आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी पालखी मैदानात सुरू आहे. दरम्यान 2019प्रमाणे यंदाही पालखी सोहळ्याच्या तोंडावरच रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतल्याने, पुन्हा एकदा पालखी सोहळ्याला पालखी तळावर येण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा देखील पालखी सोहळ्यासाठी पर्यायी मार्ग रेल्वेला उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. त्यामुळे ऐन पालखी सोहळ्याच्या तोंडावर जर पाऊस आला तर पर्यायी मार्ग कितपत उपयोगी ठरेल, याबाबत शंका निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून पालखी सोहळ्या दिवशी वैष्णवांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालखीतळावर दुसऱ्या बाजूने ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्त्याचे काम सुरू केले आहे. 2019मध्ये रेल्वे प्रशासनाकडून पालखी येण्या आगोदरच येण्या-जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र ते आश्वासन पूर्न न करू
शकल्याने वैष्णवांना पालखीतळावर येण्यासाठी शेजारी पर्यायी रस्ता लोहमार्ग ओलांडून जाण्याची नामुष्की ओढवली होती.
आश्वासनाचा पुन्हा विसर?
या सोहळ्यात येणाऱ्या वैष्णवांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जायला लागू नये तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या सोई-सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरचा जाणवू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तसेच रेल्वे प्रशासनाने भुयारीमार्गाचे काम 10 दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र, अजूनही काम सुरूच आहे. पर्यायी रस्ता व रेल्वेच्या प्रश्नांबाबत खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या माध्यमातून, रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले यांनी सांगितले.





