Pune District : ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी द्या

खासदार सुळे : वाल्हे परिसरात पाहणी दौरा
वाल्हे – राज्यात मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्हे येथील पालखी महामार्गावरील अडथळ्यांची व समस्यांची पाहणी केली. यादरम्यान त्या बोलत होत्या.
वाल्हे येथील वागदरवाडी फाटा (ता. पुरंदर) येथील भुयारी मार्गाची पाहणी खासदार सुळे व पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी नागरिकांनी विविध अडचणी सांगून त्यातून मार्ग काढण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहणाचा मुद्दा उपस्थित केला.
याबाबत सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी लवकर जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.
याप्रसंगी पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, पुणे जिल्हा सरचिटणीस विजय कोलते, सुदाम इंगळे, बबुसाहेब माहुरकर, दत्ता चव्हाण, राहुल गिरमे, माजी सरपंच महादेव चव्हाण, संभाजी पवार, गिरीष पवार, ॲड. फत्तेसिंह पवार अधिकारी, ग्रामस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
दरम्यान, वाल्हे येथील सद्यःस्थितीत झालेला उड्डाणपूल, भुयारीमार्ग चूकीच्या पद्धतीने झाला असून राज्य मार्ग क्रमांक ५० हा बंद झाला असून वाल्हे गावात, पिंगोरी, हरणी, मांडकी, वीर, परिंचे, माहूर, मांढर, सारोळा, शिरवळ आदी गावांना जोडणारा मार्ग येथील उड्डाणपूलामुळे बंद झाला आहे. सर्वप्रथम हा मार्ग खुला करावा, नव्याने मोठा भुयारीमार्ग काढावा, वागदरवाडी फाटा येथील भुयारीमार्ग मोठा करून ग्रामस्थांना येण्या-जाणाचा मार्ग खुला करावा, फरशीच्या ओढ्यापासून पुल सुरू करावा.
पाण्याच्या टाकीजवळ भुयारीमार्ग करावा, आदी मागण्या यावेळी सुळे याच्याकडेच करण्यात आल्या. दरम्यान, पालखी मार्ग चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप ग्रामस्थ बाळासाहेब भुजबळ यांनी केला. दरम्यान, सुळे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेऊन, यासंदर्भात योग्य तो तोडगा निघेल असे आश्वासन देण्यात आले. यावेळी वाल्हे सरपंच अतुल गायकवाड, वागदरवाडी सरपंच सुनील पवार, पिंगोरी सरपंच संदीप यादव, वाल्हे माजी उपसरपंच पोपट पवार, सागर भुजबळ, महेंद्र पवार, भालचंद्र भुजबळ, निलेश शिंदे, विकास पवार, विजय पवार, राजेंद्र गायकवाड, सुजित राऊत ग्रामस्थ उपस्थित होते.





