Pune District : मुळशी तहसील आवारात मृत्यूचा सापळा

पौड – मुळशी तहसील कचेरी पौडच्या आवारात अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या एका प्रचंड झाडाच्या फांद्या आता गंभीर धोका निर्माण करत आहेत. या झाडाच्या लांबच लांब पसरलेल्या फांद्या जमिनीकडे झुकल्या असून, त्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ये-जा करणार्या नागरिकांसाठी मोठा धोका बनल्या आहेत.
या फांद्या इतक्या झुकल्या आहेत की, त्या कधीही तुटून खाली कोसळण्याची शक्यता आहे. तहसील कार्यालय, नागरिक सुविधा केंद्र, रेशनिंग कार्यालय, अभिलेख कक्ष, पौड पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय येथे येणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक व महिला यांना रोज याच मार्गाने जावे लागते.
अशा अवस्थेत कोणताही अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. संबंधित प्रशासनाने त्वरित कारवाई करत या फांद्या छाटाव्यात किंवा झाडाची योग्य देखभाल करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. अपघात होण्याआधी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.





