पुणे जिल्हा : गुळूंचवाडी अपघातातील मृतांची संख्या पाचवर

उपचारादरम्या गंभीर जखमी पिंगट यांची प्राणज्योत मालवली
बेल्हे : कल्याण-अहमदनगर महामार्गावर गुळूचंवाडी (ता.जुन्नर) येथे शुक्रवारी (दि. 19) झालेल्या अपघातात ट्रकखाली चिरडल्याने जखमी झालेले जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक धोंडीभाऊ पिंगट यांचा शनिवारी (दि. 20) सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या पाचवर गेली आहे.
अंत्यविधी उरकून बेल्हे घरी परतत असताना ट्रकखाली चिरडलेल्या जखमींमध्ये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती धोंडीभाऊ सदाशिव पिंगट हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्यावर आळेफाटा येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजताच त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात येत असतानाच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
धोंडीभाऊ पिंगट यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, संचालक, बेल्हे ग्रामपंचायत उपसरपंच, बेल्हे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक या पदाची जबाबदारी संभाळली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, सुना, जावाई, नातवंडे, दोन भाऊ असा मोठा परीवार आहे.





