पुणे जिल्हा : लाडक्या बहिणींनो लाडक्या भावाला निवडून द्या

आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कनेसर येथे आवाहन
दावडी : तुमच्या गावात मी अनेक विकास केला. त्यामुळे मला तुमच्याकडून मते मागण्याचा अधिकार आहे. लाडक्या बहिणींनो लाडक्या भावाला निवडून द्या, असे आवाहन महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांचा गावभेट दौरा कनेरसार, पूर वरुडे गुळाणी वाफगाव आदी भागात झाला. कनेरसर येथे झालेल्या कोपरा सभेत मोहिते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, चंद्रकांत इंगवले,
शांताराम चव्हाण, नवनाथ होले, जयसिंग भोंगाडे, वसंत भसे, संतोष गव्हाणे, सुदाम माशेरे, सुधीर माशेरे, सत्यवान दौंडकर, कविता केदारी, अतुल कानडे, मोहन दौंडकर, बाळासाहेब खरपुडे, प्रतीक दौंडकर, कैलास धाडगे, काळुराम दौंडकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार मोहिते म्हणाले की, ठाकरवस्त्यांमध्ये विरोधी उमेवाराने काम केले होते त्याचे पैसे त्यांना देता आले नाहीत. गरीब ठाकर समाजाचे पैसे या व्यक्तीला पुरले नाहीत उद्या आमदार झाला तर खेड तालुका विकून खाईल अशी स्थिती तालुक्याची होईल. तालुक्याच्या शिक्षण संस्था बाप गेल्यानंतर मुलाला लोकांनी अध्यक्ष केले.
दररोज डबा घेऊन संस्थेत असतात. त्यांनी संस्था चावून खाल्ली. त्यांच्यासारखी निष्क्रिय माणसे संस्थेच्या जीवावर पोट भरतात, यांनी माझ्यावर टीका करताना सांभाळून बोलावे, मलाही टीका करता येते. तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही इतके पुरावे माझाकडे आहेत, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.





