पुणे जिल्हा : नाझरे जलायशात मृत पाणीसाठा

पुरंदरमध्ये 103.1 मिलीमीटर पाऊस
शेतीसाठी पाणी रोखले : पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखीव
निखिल जगताप
बेलसर – पुरंदर तालुक्यातील काही भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. पेरणीसाठीची मशागत सुरू झाली आहे. काही भागात पेरणीपूरक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत. बहुसंख्य शेतकरी मशागत करुन पेरणीसाठी सज्ज आहेत. नाझरे येथील मल्हारसागर जलाशयातील मृतपाणीसाठा 115 दशलक्ष घनफूट शिल्लक आहे. पाणीसाठा हा अत्यल्प असल्याने शेती सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाला पूर्णपणे फाटा देऊन उपलब्ध पाणी हे पाणीपुरवठा योजनांसाठी राखीव ठेवले आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता कठीण झाली आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये गुरुवार (दि.7) अखेर एकूण सरासरी 136.9 मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे. पैकी प्रत्यक्षात पडलेला पाऊस 103.1 मिलीमीटर असून, आजअखेर 75 टक्के पाऊस पुरंदर तालुक्यामध्ये पडला आहे. तालुक्यात सरासरी पेरणी लायक म्हणजे शंभर मिलीमीटरच्या आसपास पाऊस झाला असल्याने शेतकरी आता पेरणी करू शकतात, परंतु काही भागात अद्याप पाऊसच झालेला नाही. त्यामुळे त्यांनी पेरणी करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये ओढे-नाले किंवा नदीला पाणी नाही. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढली नाही. सध्याचा पाऊस हा फक्त पेरणीची तहान भागवू शकतो, परंतु भविष्यात पाणी उपलब्धता करून देणार नाही. सद्यस्थितीला नदी-नाले व लहान बंधारे पूर्ण भरले नाहीत. आषाढ महिना सुरु होऊन पंधरा दिवस झाले. परंतु यावर्षी आषाढ महिन्यात हलक्या सरी येत आहेत. आता दमदार पाऊस झाला तर धनधान्याची पेरणी होऊ शकणार आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये आता बहुतांशी ठिकाणी मशागतीच्या हालचाली दिसून येत आहेत. ट्रॅक्टर आणि बैलांच्या सहाय्याने काकरणे व नांगरणी अशा विविध मशागतींच्या कामाला वेग आला आहे. काही शेतकरी बाजरी, भुईमूग, सोयाबीन, वाटाणा, पावटा यांच्या बियाणे खरेदीवर भर देत आहेत.लागणाऱ्या खतांची ही खरेदि शेतकरी करीत आहे.
नाझरे जलाशयातील पाणीसाठा घटला
नाझरे येथील मल्हारसागर जलाशयातील मृतपाणीसाठा 115 दशलक्ष घनफूट शिल्लक आहे. पाणीसाठा हा अत्यल्प असल्याने शेती सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाला पूर्णपणे फाटा देऊन उपलब्ध पाणी हे पाणी पुरवठा योजनांसाठी राखीव ठेवले आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता कठीण झाली आहे.





