पुणे जिल्हा : दाऊदचे स्टेटस तिघांना भोवले

लोणी, उरूळी कांचनमध्ये घटना
लोणी काळभोर – सोशल मीडियावर दाऊद इब्राहिमचे स्टेटस ठेवून दोन धर्मात तेढ निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी लोणी काळभोर येथील तीन तरुणांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. उरुळी कांचन येथील तिघांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
अमिर इनामदार, अरबाज मनियार, जुबेर तांबोळी (तिघेही रा. लोणी काळभोर, ता. हवेली), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी कमलेश दत्तात्रय काळभोर (रा. लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रविवार (दि.२०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कमलेश काळभोर हे सोशल मीडिया पाहत होते. त्यावेळी त्यांनी तिघांनी त्यांच्या मोबाईलवर दाऊद इब्राहिमचे स्टेटस ठेवल्याचे पाहिले. काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतही तिघांनी स्टेट्स ठेवल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यातील दोघे अल्पवयीन असून तिघांनाही उरुळी कांचन पोलिसांकडून कायदेशीर नोटीस दिल्याची माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.





