पुणे जिल्हा : पंढरपुरात दौंडचे वारकरी भवन उभारणार

आमदार राहुल कुल : यवतमध्ये कीर्तन महोत्सवास प्रतिसाद
पारगाव : रोटी घाटात श्री. सद्गुरू नारायण महाराजांचे स्मारक व दौंड तालुक्यातील वारकरी भाविकांच्या सोयीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकरी भवन उभारणार असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.
श्रावणमास निमित्त कै.सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य भजन स्पर्धा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यवत येथे सांगता समारंभ पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले.
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी तालुक्यातून जात असून, दौंड तालुक्याला मोठा सांप्रदायिक वारसा लाभला आहे. त्यामुळे तालुक्यातील गायक, वादक, भजनी मंडळांना व्यासपीठ मिळावे या हेतूने स्पर्धा व कीर्तन महोत्सव भरविला आहे. तालुक्यातील २५० हून अधिक मंदिराच्या समोर सभामंडप बांधकाम, जीर्णोद्धार, मंदिरांसाठी पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
काही मंदिरांना तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देणे यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. तालुक्याच्या सीमेवर पांडवकालीन भुलेश्वर मंदिराला वन पर्यटन मधुन निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दौंडचे वारकरी भवन नसून भाविकांच्या सोयीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकरी भवन उभारणार आहे.
ह.भ.प श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर यांनी मागणी केल्याप्रमाणे रोटी घाटात श्री. सद्गुरू नारायण महाराजांचे स्मारक उभारणार असल्याचा विश्वास यावेळी आमदार राहुल कुल यांनी दिला. यावेळी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार रंजना कुल, ह. भ. प. गुरुवर्य सुदाम गोरखे गुरुजी, ह. भ. प. श्री. सुमंत महाराज हंबीर, ह. भ. प. श्री.सुरेश महाराज साठे, ह. भ. प. गुलाब महाराज लवंगे, ह. भ. प.नाना महाराज दोरगे, ह. भ. प. सोळसकर महाराज, ह. भ. प. दीपक महाराज मोटे, कांचन कुल, कीर्तनकार, मृदंगमनी, गायक, हार्मोनियम वादक उपस्थित होते.
स्पर्धेत ८० मंडळांचा सहभाग
विजेते पुढीलप्रमाणे- प्रथम क्रमांक – श्री. विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ, स्वामी चिंचोली, द्वितीय – श्री. राजेश्वर भजनी मंडळ, राजेगाव, तृतीय – श्री. सावतामाळी भजनी मंडळ , नानगाव. उत्तेजनार्थ परितोषिक – श्री. विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, डाळिंब, स्वरांगण भजनी मंडळ, गोपाळवाडी, बोराटेवस्ती भजनी मंडळ, नांदुर, श्रीराम भजनी मंडळ, केडगाव, विभागीय विजेते – विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ पारगाव. श्री. विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, कामठवाडी, भैरवनाथ भजनी मंडळ, खडकी, नागेश्वर भजनी मंडळ, पाटस, संत यादव बाबा भजनी मंडळ, वडगाव बांडे, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, खोर, यादववाडी भजनी मंडळ, खामगाव.





