Pune Distric: वाशिम जिल्हा पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे

इंदापूर : राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी (दि. 26) एका पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली आहे. हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सन 2024 मध्ये दत्तात्रेय भरणे हे सलग तिसर्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते.
सन 2019 मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम केलेले आहे. शिवाय त्यांनी काही काळ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलेले आहे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे विश्वासू मंत्री म्हणून ओळखले जातात.
भरणे यांची राजकीय कारकीर्द ही सहकार क्षेत्रातून झाली आहे. यानुसार ते सन 1996 मध्ये पहिल्यांदा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) संचालक म्हणून निवडून आले. तेव्हापासून आजतागायत ते जिल्हा बँकेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. दरम्यान सन 2002 ते 2007 या कालावधीत ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते.





