Pune District : उन्हाळ्यात ओसंडून वाहणारे बंधारे, पावसाळ्यात कोरडेठाक

दौंडज खिंड परिसरातील स्थिती : महिन्यापासून पावसाची दडी
वाल्हे – दौंडज खिंड (ता.पुरंदर) परिसरात ऐन उन्हाळ्यातील मे महिन्यात संततधार दमदार पावसाने येथील बंधारे भरून ओसंडून वाहत होते. मात्र, एक महिन्यापासून ऐन पावसाळ्यात या परिसरात पावसाने उघडीप दिल्यानंतर व उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत असल्याने ऐन उन्हाळ्यात ओसंडून वाहत असलेले बंधारे, ऐन पावसाळ्यात कोरडेठाक पडले आहेत.
दौंडज खिंड, पिंगोरी,कवडेवाडी,जेजुरी येथील कडेपठार खोर्यामध्ये मे महिन्यापासून समाधानकारक पाऊस झाला होता. यामुळे या परिसरातील जमिनीतील पाणीपातळीत मोठी वाढ होऊन ओढे, नाले, बंधारे ओसंडून वाहू लागले;या परिसरात दुष्काळात तयार केलेले जवळपास 20 साखळी बंधारे बांधण्यात आले होते* जलयुक्त शिवार अभियानांतर्गत खोलीकरण केलेले पाझरतलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील शेतकर्यांना दिलासा मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, मागील महिन्यापासून या परिसरात पावसाने उघडीत दिल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
पिकांसासाठी पाऊस गरजेचा
खरीप हंगामात बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, चवळी, हुलगा, घेवडा, वाटाणा आदींसह अन्य कडधान्यांच्या पेरणी करण्यात आली आहे. यंदा पावसाने वेळेआधी सुरुवात केली होती. त्यामुळे या वर्षी खरीप हंगाम चांगला होईल, अशी आशा शेतकर्यांना लागून राहिली आहे. यातच खरीप हंगामातील बहुतांश पिकांची खुरपणी अंतिम टप्प्यात आली असून सद्यःस्थितीत रिमझीम पावसाची गरज असतानाच, पावसाने दडी मारल्याने, येथील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होत आहेत.





