Pune District : श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे अर्धपीठ गणपतीच्या दर्शनाला गर्दी

मंचर – आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील अर्धपीठ गणपतीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी झाली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. गणेश मूर्तीसमोर 21 डझन केळीची सजावट करण्यात आली.
श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पहाटे पुजारी जगदीश जोशी यांनी महापूजा केली. महापूजा झाल्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला. कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. नारायणगाव येथील भाविकांनी 21 डझन केळी अर्पण केली. अर्धपीठ गणपती समोर या केळीची सजावट करण्यात आली होती.
नववीतील श्रेयस संदीप डोके या मुलाने अर्धपीठ गणपतीचे स्केच तयार करून ते श्री चरणी अर्पण केले. दरम्यान दिवसभर पावसाचे वातावरण होते अधून मधून रिमझिम पाऊस पडत होता. मात्र तरीही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत होते. भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत भाविकांनी रांगेतून दर्शन घेतले.
अर्धपीठ गणपतीच्या पेशवेकालीन मंदिरावर उद्योजक श्याम गुंजाळ यांच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर दुपारी मोरया मंगल कार्यालयाचे सुमित लांडे यांच्यावतीने भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
उद्योजक नरेंद्र घुले यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी सात वाजता, दुपारी तीन वाजता व सायंकाळी सात वाजता मुख्य आरती झाली. चंद्रोदय झाल्यानंतर श्रीसं नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम झाला. इतर राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते.





