पुणे जिल्हा : मंचर-घोडेगाव येथील कपड्यांच्या दुकानात कापड खरेदीसाठी गर्दी

मंचर : दीपावलीनिमित्त मंचर-घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील कपड्यांच्या दुकानात तुफान गर्दी कापड खरेदीसाठी होत आहे.दिवाळी सणाला नवीन कपडे घालण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. याच पार्श्वभूमीवर कपड्यांच्या दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
नागरिक आपल्या कुटुंबीयांसाठी, नातेवाईकांसाठी नवीन कपडे खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात.दिवाळी हा आनंदाचा सण असल्याने नवीन कपडे खरेदी करत असतो. यामुळे कपड्यांच्या दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी होणे स्वाभाविक आहे.विशेषकरून महिलांच्या कपड्यांच्या दुकानात तर प्रचंड गर्दी असते. साड्या, पँट शर्ट यांसारख्या पारंपरिक कपड्यांची मागणी सर्वाधिक असते. अशी माहिती मंचर येथील उत्तम भाग्य कापड दुकानाचे मालक संदीप म्हसे यांनी दिली.
तरुण पिढी आधुनिक स्टाईलच्या कपड्यांकडे अधिक आकर्षित होते.कपड्यांच्या दुकानांनीही दिवाळीच्या निमित्ताने विविध प्रकारच्या ऑफर्स आणि डिस्काउंट्स देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे ग्राहकही खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात.अशी माहिती मंचर येथील इंडिया क्लॉथ एम्पोरियमचे मालक भरत बांगर यांनी दिली.कपड्यांच्या दुकानांसह शॉपिंग मॉल्स आणि बाजारपेठांमध्येही दिवाळीच्या निमित्ताने विशेष सजावट करण्यात आली आहे.
यामुळे खरेदीचा अनुभव अधिक आनंददायी बनतो.सर्वसाधारणपणे दिवाळी हा सण भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे. या सणाला नवीन कपडे घालून, एकमेकांना भेटवस्तू देऊन आनंद साजरा करण्यासाठी सर्वांची लगबग सुरू आहे.अशी माहिती मंचर येथील गुरु कलेक्शनचे मालक अमित बाणखेले यांनी दिली.





