Pune District : महागणपतीच्या मुक्तद्वार दर्शनासाठी भाविकांची गर्दी

रांजणगाव गणपती – अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र रांजणगाव येथील महागणपतीची दरवर्षीप्रमाणे द्वारयात्रेची भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरुवात झालेली आहे. या यात्रेसाठी देवस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ही द्वारयात्रा २४ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट पर्यंत चालणार असून द्वारयात्रेसाठी राज्यातून तसेच देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. वर्षातून एकदाच असे दर्शन होत असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असल्याची माहिती देवस्थानच्या अध्यक्ष स्वाती पाचुंदकर पाटील यांनी दिली.
रविवारी (दि. २४) पहाटे तीन वाजता महागणपतीला अभिषेक करून अध्यक्ष स्वाती पाचुंदकर पाटील, मुख्य विश्वस्त ओमकार देव, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर पाटील, खजिनदार विजय देव, रांजणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे व देवस्थान कर्मचारी यांच्या उपस्थितीत महागणपतीची आरती करून पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
सोमवारी (दि. २५) दुसर्या दिवशी निमगाव म्हाळुंगीकडे असलेल्या निमगाव आसराई म्हाळुंगी गावातील (शिरसाई) देवीकडे पालखीचे प्रस्थान झाले. दुसर्या दिवशी पालखीचे मानकरी माळी आळी होती. पालखी सोहळ्यामध्ये ग्रामस्थ, मानकरी, सेवेकरी यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट यांनी आयोजन केले आहे.
भाविकांसाठी लागणार्या सुविधा, त्यामध्ये पिण्याचे पाणी, महाप्रसाद, सुसज्ज दर्शन रांग, प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणगाव गणपती यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी, इत्यादी सुविधा तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रांजणगाव पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रा काळात मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट व लायटिंग डेकोरेशन देवस्थानने केले आहे. यात्रा काळात भाविकांनी मोठ्या संख्येने महागणपतीच्या मुक्तद्वार दर्शनासाठी यावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.





