Pune District : बाळूमामांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

मासाळवाडीत पालखी सोहळा मुक्कामी
लोणी भापकर – श्रीसंत सद्गुरू बाळूमामा पालखी सोहळा (बग्गा नं.४) मासाळवाडी (ता. बारामती) याठिकाणी गेले तीन चार दिवसापासून मुक्कामी आहे. श्री संत बाळूमामा पालखी सोहळा ठोंबरेवस्ती येथील मुक्काम उरकून मासाळवाडीत विसावला.
बाळूमामांच्या तळावर आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व असते, याबाबत माहिती देताना श्री बाळूमामा पालखी कारभारी बाळू शिनगारे म्हणाले की, मासाळवाडीत हा पालखी सोहळा नंबर ४ असून यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १९ पालख्या आहेत. ४५ हजार बकरी असून बग्गा नं. ४ मध्ये २ हजार बकरी आहेत. ४ दिवस मासाळवाडी गावात मुक्कामी असलेल्या पालखीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मासाळवाडीत चार दिवसांपासून भजन, कीर्तन, प्रवचन, ओव्या, गजीनृत्य, ढोल लेझीम असे विविध कार्यक्रम घेण्यात येत असून याठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. पहिल्या दिवशी या पालखी सोहळ्याचे ढोल- ताशांच्या गजरात वाजत गाजत मासाळवाडी ग्रामस्थांनी आनंदाने स्वागत केले.
मासाळवाडी, तरडोली, पवळी व पळशीच्या परिसरातील भाविक भक्तांनी श्री बाळूमामा यांची बकरी पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. मासाळवाडी परिसरातील शेतकरी, भक्त आवर्जून बाळूमामाच्या बकर्यांना आपल्या शेतात नेऊन चारा खाण्यास घालत आहेत. दररोज सकाळी सायंकाळी आरती व महाप्रसादाचेही मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत आहे. पालखी सोहळ्यास मासाळवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी सहकार्य केले.





