पुणे जिल्हा : पतसंस्था कर्जदारांची विमा पॉलीसी घेणार

सर्वसाधारण सभेत निर्णय : बारामती उपविभाग बाजार समिती सेवक पतसंस्था
बारामती – बारामती उपविभाग कृषी उत्पन्न बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यापुढे सेवक पतसंस्थेने कर्जदारांची विमा पॉलीसी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सेवकांच्या पगारानुसार कर्ज मर्यादा ठरवताना पगाराचा दर पाच हजारांचे टप्प्यात कर्ज मर्यादा ठरविण्यात आली.
बारामती उपविभाग बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्थेची स्थापना बारामती, दौंड, इंदापुर व पुरंदर या तालुक्यांतील बाजार समिती सेवकांची मिळून २००० मध्ये करण्यात आली. संस्थापक चेअरमन म्हणून बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप होते. योगायोगाने रौप्य महोत्सवी वर्षात जगताप हेच अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली २४ वी सर्वसाधारण सभा झाली.
पतसंस्थेच्या स्थापनेस २५ वर्षे झाल्याने रौप्य महोत्सवी वर्ष १२ जून रोजी कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. स्मरणिका प्रकाशन, १० व १२ वीमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जादा गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सेवकांची मुले डॉक्टर, इंजिनिअर, बी. टेक उर्तीर्ण झाली आहेत. त्यांचाही सत्कार बारामती बाजार समितीचे सभापती सुनील पवार आणि नीरा बाजार समितीचे सभापती शरदराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मान्यवरांच्या हस्ते केक कापून व स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आला.
यावेळी सभापती सुनील पवार, शरद जगताप यांनी भाषण केले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती निलेश लडकत व सदस्य तसेच नीरा बाजार समितीचे सदस्य प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सेवक पतसंस्थेचे उपाध्यक्ष आशपाक मुलाणी, व्यवस्थापक रवींद्र तरटे, संचालक सूर्यकांत मोरे, शरद भोसले, बाबासाहेब देवकाते, सुरेखा कुर्ले, कृष्णांत खलाटे, अविनाश बळगानुरे, तुषार माने, संतोष शिंदे, सभासद, दौंड बाजार समितीचे सचिव मोहन काटे उपस्थित होते. सूत्रसंचालन सूर्यकांत मोरे व शरद भोसले यांनी केले. उपाध्यक्ष आशपाक मुलाणी यांनी आभार मानले.
६.४० टक्के लाभांश वाटप
सेवक पतसंस्थेचे भाग भांडवल १.८६ कोटी असून कर्ज मर्यादा ५ लाख ते ३८ लाखापर्यंत आहे. कर्जावरील व्याजदर ६.६५ टक्के असून गेली २४ वर्षे पतसंस्थेस लेखा परीक्षण अ वर्ग मिळाला आहे. गेली २४ वर्षे पतसंस्था जूनअखेर पर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करून सभासदांना दरवर्षी लाभांश वाटप केले जाते. यावर्षी ६.४० टक्के लाभांश वाटप करण्यात आला.





