Pune District : सणसवाडीतील मनुष्य वस्तीतील गवे अखेर जंगलात

शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरूर) येथे दोन दिवसांपूर्वी अचानकपणे दाखल झालेले दोन रानगवे मनुष्यवस्तीतून जंगली भागात पाठवण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले असून नागरिकांना परिसरात कोठे गवे आढळून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्यांना न डिवचता वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन शिरुर वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी केले आहे.
सणसवाडी येथे सोमवारी (5 मे) रोजी सकाळच्या सुमारास दोन भलेमोठे रानगवे आढळून आले. त्यानंतर आज सकाळच्या सुमारास अचानकपणे पुणे-नगर महामार्गालगत नागरी वस्तीत दोन्ही गवे दिसून आल्याने खळबळ उडाली आणि नागरिकांनी केलेल्या गोंगाटमुळे गवे घाबरू लागले.
याबाबतची माहिती शिरुर वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना मिळताच वनपाल गौरी हिंगणे, वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, वनविभाग रेस्क्यू टीम मेंबर व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, अमोल कुसाळकर, शुभम वाघ, नेचर गार्ड ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष गणेश टिळेकर, सचिव शुभांगी टिळेकर, बाळासाहेब मोरे, वैभव निकाळजे, श्रीकांत भाडळे, राहुल गायकवाड यांनी तातडीने सदर ठिकाणी धाव घेत, पोलीस हवालदार उद्धव भालेराव, दामोदर होळकर, वार्डन बाळासाहेब शेलार यांच्या मदतीने पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक थांबवत नागरी वस्तीतील दोन्ही गवे वनविभागाच्या हद्दीतून जंगली भागात नेले. त्यामुळे नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले असून याबाबत बोलताना सणसवाडी भागातील गव्यांवर वनविभाग लक्ष ठेवून आले.
नागरिकांना कोठे गवे आढळून आल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न न करता वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन शिरुर वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी केले आहे.





