पुणे जिल्हा : मंचर शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ

– दुचाकी चोरून नेणाऱ्या चोरट्याचे छायाचित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
मंचर – मंचर शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरटे टेहळणी करून विविध ठिकाणीं पार्क केलेल्या दुचाकी चोरून नेत असल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुचाकी चोरून नेतानाचे चोरट्याचे छायाचित्र सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.
निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील श्रवण सुनील जाधव (वय २०) हा सोमवार, दि. १६ रोजी कॉलेजच्या कामानिमित्त पुणे येथे गेला असता त्याने त्याची एम एच १४, डी आर ७४३५ ही दुचाकी मंचर येथील मॅक्स फिटनेस स्टुडिओ जिमसमोर लावली होती. दोन दिवस पुणे येथे राहिल्यानंतर तो गुरुवार, दि. १९ रोजी साडेसहा वाजता मंचर येथे आला असता त्यांनी लावलेले ठिकाणी त्याला दुचाकी दिसली नाही.
त्यावेळी त्यांनी आजूबाजूचे सीसीटिव्ही फुटेज तपासले असता एक अज्ञात चोरटा रात्रीच्या वेळी दुचाकी चोरून नेत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत श्रवण जाधव यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच रविवार, दि. १५ रोजी शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर येथील तरुण मिननाथ दिनकर शिंदे यांनी रात्री १०:३० वाजण्याच्या दरम्यान त्याची २० हजार रुपये किमतीची एम एच १४, सी ई ७५७१ दुचाकी मंचर येथील बाजार तळ येथे पार्क करून ठेवली असता सदर दुचाकी व मोबाईल हँडसेट अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. याबाबत मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून मंचर पोलीस पुढील तपास करत आहे.
नागरिक त्रस्त
मंचर शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांना मात्र दुचाकी चोरटे सापडत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.





