पुणे जिल्हा: आंब्याच्या पेट्या रस्त्यात ठेवल्याने वाद; आंदेशे येथे 22 वर्षीय तरूणाचा खून

पौड – आंब्याच्या पेट्या रस्त्यात का ठेवल्या म्हणून जाब विचारल्यानंतर भांडण झाले. मात्र त्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना आंदेशे (ता. मुळशी) येथील गाडे फार्महाऊसजवळ घडली. यामध्ये शंकर संतोष उर्फ गफूर तोंडे (वय २२ वर्ष, रा.खेचरे, ता.मुळशी) या तरुणाचा बळी गेला आहे.
पौड पोलिसांकडून तसेच स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १५) दुपारी आंदेशे येथील गाडे फार्महाऊसजवळील पायवाटेवर आंब्याची कॅरेट ठेवली होती. त्याच पायवाटेने दत्तू वाटाणे आणि त्याचे साथीदार चालले होते. त्यावेळी दत्तू वाटाणे याने आंब्याची कॅरेट रस्त्यावर का ठेवली असा जाब विचारला. त्यावरून वाटाणे आणि तोंडे यांच्यात शाब्दीक वादविवाद झाला.
स्थानिक नागरिकांनी तो वाद मिटवला होता. पुन्हा संध्याकाळी यावरून पुन्हा वाद झाला. या वादाचे रूपांतर रात्री उशिरा भांडणात झाले. निर्जन ठिकाणी झालेल्या हाणामारीत शंकर तोंडे याच्यावर वार झाले त्यात तो मयत झाला. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार एक-दोन वेळा वाद स्थानिकांनी मिटवला होता, मात्र रात्री उशिरा झालेली हाणामारीचा व खुनाचा प्रकार ग्रामस्थांना माहीत नव्हता.
गावापासून दूर निर्जन ठिकाणी प्रकार झाल्याने ग्रामस्थांना त्याबद्दल काहीच माहीत नव्हते. दुसऱ्या दिवशी उशिरा हा प्रकार उघडकीस आला. शंकर तोंडे याचा अतिशय निर्घृण खून करण्यात आला असून डोक्यावर दगडाने अथवा कोणत्यातरी धारदार हत्यारांनी मोठी जखम करून ठार मारण्यात आल्याचे पौड पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी दत्तू दिलीप वाटाणे (रा.आंदेशे, ता.मुळशी) व त्याचे इतर साथीदार फरार आहेत. त्यातील दोन आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी व इतर साथीदारांचा शोध सुरु असल्याचे पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सांगितले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव करत आहेत. फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.





