राजगुरूनगर : खेड तहसीलदार कार्यालयात तालुक्यातील जनता वकील आणि अधिकार्यांमध्ये कायमच वादावादी होत असल्याने एक चर्चेचा विषय बनला आहे. वारंवार घडणार्या घटनांमुळे राजकारण होत असल्याची चर्चा आहे. अधिकार्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे. खेड तहसीलदारांपुढे मंगळवारी (दि. 28) तारखांची सुनावणी सुरू होती. तहसीलदार ज्योती देवरे या रजेवर असल्याने पक्षकारांना पुढची तारीख दिली. मात्र पक्षकार किंवा वकिलांना त्याची माहिती न मिळाल्याने त्यांना तिष्ठत उभे राहावे लागले. यावरून जाब विचारताना नायब तहसीलदार आणि पक्षकार आणि त्यांचे वकील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. दोन्हीं बाजूने खेड पोलिसांत तक्रार देण्यापर्यंत प्रकरण गेले. मात्र तक्रार न होता हे प्रकरण मिटवून घेण्यात आले.तहसीलदार कार्यालयातील या वादाची चर्चा तालुक्यात मात्र चांगलीच रंगली आहे. घडलेल्या घटनेत अनवधानाने बोलणे झाले. त्यात दिलगिरी व्यक्त झाल्याने तक्रार केली नाही असे नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी सांगितले. घटनेच्या वेळी कार्यालयात असलेले महसूलचे नायब तहसीलदार राम बीजे हे यावेळी उपस्थित होते. सुनावणीच्या तारखेची पूर्वसूचना नव्हती. आम्ही घाईघाईने तहसील कार्यालयात गेलो. माझे पक्षकार आणि मला तिष्ठत ठेवले. त्यावेळी अधिकारी गप्पा मारत बसले होते. विचारणा केली असता अरेरावी केली. त्यांनी पोलिसांना बोलावले. हा माझा अवमान आहे. प्रकरण मिटले घेतले नाही तर मलाही योग्य ती न्याय्य कारवाई करावी लागेल. – अॅड विलास काळे, ज्येष्ठ विधीज्ञ विधानसभा निवडणुकी नंतर तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकार्यांना नियमानुसार काम करू दिले जात नाही. अधिकारी दबावाखाली येऊन चुकीचे काम करतील, चुकीचे निर्णय घेतील. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. तालुक्यात विधानसभा निवडणुकी नंतर घडत असलेल्या प्रकाराबाबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती देणार आहोत. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांना याबाबतचे निवेदन देण्यात येणार आहे. अधिकार्यांनी निर्भयपणे काम करावे त्यांच्या पाठीशी महायुतीचे सरकार आहे – दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार, खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ