पुणे जिल्हा : कडूसमध्ये ठेकेदाराचा कामचुकारपणा

कडूस ते चांडोली रस्त्याची दुरुस्ती रखडलेलीच : दोन महिन्यांपासून एसटी बंदच
राजगुरूनगर : कडूस ते चांडोली रस्ता दुरुस्ती आणि ठेकेदार यांच्या कामकुचारपणामुळे कडूस पुढील कोंहिडे, तळवडे, गारगोटवाडी या गावांना जाणारी व प्रवासी सेवा देणारी एसटी बस बंद असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांचे हाल होत आहेत.
कडूस पुढील कोंहिडे, तळवडे, गारगोटवाडी या गावांना जाणारी व प्रवासी सेवा देणारी एस टी बस बंद आहे या परिसरातील नागरिक, शाळेतील विद्यार्थ्यांना, कंपनीतील कामगारांना तब्बल दोन महिने संघर्ष करावा लागत आहे.
दोन महिने झाले तरी सुद्धा रस्त्याच्या कामात प्रगती नसल्याचा आरोप जनसेवक दत्ताभाऊ कंद यांनी केला आहे. कडूस येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करण्याचे काम चालू आहे. अनेक महिने सुरू असलेल्या या कामामुळे व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
कडूस ते चांडोली या भागात ठिकठिकाणी रस्त्यावर जुन महिन्यात खडी डांबर आणुन ठेवण्यात आले. पावसाळ्यात ते रस्त्यावर टाकण्यात आले. त्यामुळे खड्डे झाकण्याचा खर्च वाया गेला आहे, असा आरोप करून दत्ता कंद यांनी या रस्त्याच्या कामात प्रगती होईल, अशी कारवाई शासनाने तातडीने करावी, अशी मागणी केली आहे.





