मंचर : नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली असून नागरिकांच्या गाठीभेटींना सुरुवात केली असुन विविध कार्यक्रमांना इच्छुक उमेदवारांची हजेरी वाढली आहे. तर अनेक उमेदवारांनी हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यावर भर दिला आहे. राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर लवकरच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांच्या निवडणुका जाहीर होणार असून त्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाने राज्यात कार्यकर्ता नोंदणी, कार्यकर्त्यांची मेळावे या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच नगरपंचायत निवडणुका जाहीर होतील, असा अंदाज लावला जात आहे. त्या दृष्टीने मंचर नगरपंचायतसाठी नगराध्यक्ष, नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मंचर नगरपंचायत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच नगरपंचायतीची निवडणूक लागणार आहे. त्यामुळे मंचर नगरपंचायतचा पहिला नगराध्यक्ष कोण होणार याकडे, सर्वांचे लक्ष लागले असून प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार ताकतीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्या दृष्टीने इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी, विविध कार्यक्रमांना हजेरी, नागरिकांच्या समस्या सोडवताना दिसत आहेत.मंचर नगरपंचायत चे निवडणुकीची प्रक्रिया जाहीर झाली नसली तरी अनेक इच्छुक उमेदवार आपापल्या वार्डातून चाचपणी करताना दिसत आहे. मंचर नगरपंचायतीची निवडणूक ही महाविकास आघाडी व महायुती यांच्यात होणार असली तरी अनेक इच्छुक उमेदवारांना संधी न मिळाल्यास तिसरी आघाडी देखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे इच्छुक उमेदवारांमध्ये संजय थोरात, सुनील बाणखेले, मंगेश बाणखेले, स्वप्निलबाबा बेंडे, कल्पेश बाणखेले, उद्योजक प्रशांत बागल,प्रवीण मोरडे,धनेश मोरडे, बाजीराव मोरडे ,स्वातीताई घुले,जागृतीताई महाजन यासह अनेक इच्छुक आहेत. तर महाविकास आघाडीकडून दत्ता गांजाळे, राजाराम बाणखेले,अपक्ष वंसतराव बाणखेले यासह अनेकजण इच्छुक आहेत. चाचपणी सुरू… दरम्यान निवडणुकीला जरी वेळ असला तरी आतापासूनच इच्छुक उमेदवारांनी आपण आपल्या वार्डातून कशाप्रकारे निवडून येऊ शकतो या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून महायुती व महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते कुणाला संधी देणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.