पुणे जिल्हा : थेऊरच्या चिंतामणी मंदिरावर चढून मनोरुग्णाचा गोंधळ

थेऊर : येथील चिंतामणीच्या मंदिरावर चढून एका मनोरुग्ण असलेल्या तरुणाने आरडा-ओरड करत नुकताच तुफान गोंधळ घातला. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणीच्या मंदीरावर तीन तासांपैकी अधिक वेळ घातलेल्या या गोंधळाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नुकतीच ही घटना घडली असून या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
संदीप पोपट गायकवाड, मूळ गाव आष्टी जिल्हा बीड, (सध्या राहणार भिल्ल वस्ती, थेऊर) असे गोंधळ घालणार्या तरुणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील संदीप गायकवाड हा तरुण मनोरुग्ण आहे. मागील अनेक दिवसांपासून संदीप हा त्याच्या बहिणीकडे थेऊर येथे राहत आहे.
थेऊर येथील चिंतामणीच्या मंदिरात भाविक दर्शनासाठी नियमित येत असतात. हा मनोरुग्ण तरुण हा मंदिर परिसरात आला होता. यावेळी त्याला सुरक्षारक्षकांच्या मदतीने मंदिरात गोंधळ घालत असल्याने बाहेर काढण्यात आले होते. यावेळी मंदिराच्या बाहेर काढल्यानंतर संदीप याने मंदिराच्या बाहेरून चिंतामणी मंदिराच्या सभामंडपवार चढाई केली. यावेळी मंदिरातील सुरक्षारक्षक व त्याठिकाणी असलेल्या मंदिरातील व्यक्तींनी संदीपला खाली घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले.
मात्र दोन ते तीन तास झाले तरी तरुण खाली आला नाही. उलट सभामंडप व परिसरात फुटलेली कौलारे घेऊन भाविकांना उभा राहून मारू लागला. दरम्यान, सदर घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आली. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना पाहून त्याने कौलारे मारण्यास सुरू केली. तो पोलिसांनाही आवरत नसल्याने मार्शलला बोलविण्यात आले. यावेळी लोणी काळभोर पोलीस, मंदिरातील सुरक्षारक्षक व भाविकांच्या तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला खाली घेण्यात आले.





