पुणे जिल्हा : वारुळवाडीत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, रुंदीकरण वेगाने

नारायणगाव – पुणे-नाशिक महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून वारुळवाडीतील ठाकरवाडी चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व कॉंक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. भविष्यातील वाहतुकीच्या अडचणी लक्षात घेऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांनी मंजूर केलेल्या निधीमुळे वारुळवाडी, ठाकरवाडी, गुंजाळवाडी व सावरगावच्या नागरिकांना वाहतुकीसाठी चांगला रस्ता तयार होणार आहे. दरम्यान, पर्यायी रस्ता उपलब्ध केला आहे.
रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे केबल, पाण्याचे पाइप आदी कारणांसाठी रस्ता खोदण्यास लागू नये, यासाठी प्रत्येक 100 मीटरवर रस्त्याच्या आरपार पाइप टाकण्यात आले आहेत. हा पर्यायी रस्ता सावरगाव, गुंजाळवाडी, ठाकरवाडीकडून नारायणगावच्या दिशेने येणाऱ्या नागरिकांनी वेताळबाबा (आठवडे बाजार) रस्त्याचा वापर करावा. मीना नदी पात्रातून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला असून वाहतुकीसाठी अडचण नाही.
तर पुण्याकडे जाण्यासाठी कालव्याच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा. वारुळवाडी रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासह रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे. भविष्यात मीना नदीवर पूल टाकून कायमस्वरूपी रस्ता तयार केल्यास जुन्नर, ओझर, आळेफाट्याकडे जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता तयार होईल अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वारुळवाडी रस्त्याचे कॉंक्रिटीकरणासह रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वारूळवाडी, गुंजाळवाडी व सावरगावकडील नागरिकांचे वाहतुकीची गैरसोय झाली असल्याची जाणीव आहे; परंतु भविष्यातील गरज ओळखून रस्त्याचे दर्जेदार काम होण्यासाठी ग्रामपंचायतने तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या पर्यायी रस्त्याचा वापर करून सहकार्य करावे.
– राजेंद्र मेहेर, सरपंच, वारुळवाडी





