Pune district : नीरेत दिगंबर जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वाची सांगता

नीरा – पुरंदर तालुक्यातील नीरा येथील दिगंबर जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वाची सांगता मंगळवारी ( दि. 9) ग्रामप्रदक्षिणाने झाली. यावेळी पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.
जैन धर्मामध्ये सणांचा राजा पर्युषण पर्व मानले जाते. ऋषिपंचमी ते अनंत चतुर्दशीपर्यंत दहा दिवस जैन धर्माचे महापर्व समजले जाते. जैन बांधवांकडून दररोज सकाळी पंचामृत अभिषेक पुजापाठ दुपारी तत्वार्थसुत्र सायंकाळी आरती आणि धर्म प्रभावना, विविध सांस्कृतिक कार्यक्रम दररोजच्या धर्माचे महत्त्व स्वाध्यायातून त्याचबरोबर दररोज प्रतिक्रमण करून आणि विविध व्रताच्या माध्यमातून करण्यात आले.
या पर्वामध्ये डॉ. श्रेणिक शहा यांनी पाच उपवास तर सारिका रोहित जैन व अलिशा नवेंदू शहा यांनी रत्नत्रयाचे तीन उपवास करून आत्मसाधना केली. जैन परंपरेनुसार मन वचन कायने अजाणतेपणाने एकमेकांची मने दुखविले गेली असल्यास याबद्दल क्षमा याचना करून क्षमावली संपन्न झाली. या दशलक्षण पर्वाची सांगता ग्राम प्रदक्षिणेने महावीरांचा जयजयकार करत सहवाद्य मिरवणुकीने पार पडली. पालखी मागे जोडीने कुंभ घेऊन फिरण्याचा मान राजेंद्र नेमिनाथ जैन आणि वनमाला राजेंद्र जैन यांना मिळाला.
पालखीनंतर चढावे, भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. या सर्व विधीनंतर राजेंद्र जैन व परिवाराच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी सुरेश शहा, मनोज शहा, पद्मराज कोठडिया, राजेंद्र जैन, रेणुका कोठडिया, शैला शहा या विश्वस्तांसहसंपूर्ण जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





