अवैध व्यवसायाविरोधात प्रशासन अलर्ट निलेश वाळुंज यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा शिरूर – शिरूर तालुक्यात दिवसेंदिवस बळावलेल्या अवैध दारू, ताडी व गुटख्याच्या विळख्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने तालुकास्तरीय अवैध दारू प्रतिबंध समितीच्या बैठकीचे आयोजन तहसील कार्यालयात केले होते. यावेळी अन्नापूर, कर्डेलवाडी व चिंचणी येथील नागरिकांनी अवैध दारूबंदीबाबत जोरदार तक्रारी केल्या. अनेक व्यावसायिक अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करीत असल्याच्या तक्रारीही यावेळी मांडल्या. सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने ही बैठक फलद्रूप ठरली आहे. वाळुंज यांनी शासनाचे परिपत्रक, नियम, कायदे यांचा आधार घेत त्यांनी केवळ तक्रारी न करता ठोस कायदेशीर मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या. २००४ च्या शासन परिपत्रकानुसार प्रशासनाला बैठकीसाठी बांधील केले. वाळुंज यांनी बैठकीत मांडलेल्या प्रमुख मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यावेळी वाळुंज यांनी विविध शासन निर्णय, कायदेशीर तरतुदी, परिपत्रके, ठरावांचे २३२ पानांचे दस्ताऐवजीकरण तहसीलदारांना सादर केले. यावेळी २०२० मधील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परिपत्रकाची कठोर अंमलबजावणी, अवैध दारू विक्रेत्यांवर ए्मपीडीएअंतर्गत हद्दपारीची कारवाई, ढाब्यांवर अवैध दारू विक्री सापडल्यास गुन्हा नोंदवून परवाना रद्द करणे, प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल त्वरित स्थापन करणे, ज्यांच्या हद्दीत अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट आहे, त्या पोलीस व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, सर्व आदेशांची अंमलबजावणी तपासण्यासाठी तहसीलदार अध्यक्षतेखाली मासिक बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करणे, आदी मागण्या करण्यात आल्या. बैठकीस तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, महादेव वाघमोडे (रांजणगाव), शिक्रापूर पोलीस निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक माधव झेंडे, सहायक पोलीस निरीक्षक कारंडे, एस. एम. धस, पत्रकार: नितीन बारवकर, अरुणकुमार मोटे, रवींद्र खुडे, सागर रोकडे, सामाजिक कार्यकर्ते, ॲड. प्रवीण कर्डिले, अनिल चौधरी, संतोष शिंदे, प्रदीप दसगुडे, संजय कुरंदळे, विशाल शिंदे, केशव शिंदे, मनसेचे प्रतिनिधी अविनाश घोगरे उपस्थित होते. ‘अन्नापूर’ हे मॉडेल गाव विकसित करा यावेळी बैठकीत दारुचा गुन्हा असलेल्यांकडून गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घेणे व हद्दपारी करणे, प्रलंबित प्रकरणांची वेळेत निकाली काढण्याची सक्ती, अवैध दारू हॉटस्पॉट गावांची यादी करून विशेष कृती आराखडा राबवणे, ग्रामपंचायतींनी देखील कारवाईत सहभाग घेणे, ‘अन्नापूर’ हे गाव दारूबंदीसाठी मॉडेल गाव म्हणून विकसित करणे याकडे लक्ष वेधण्यात आले. आदेश फाईलपुरते नको यावेळी बैठकीतील मागण्या गांभीर्याने ऐकून घेत तालुका समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी तीनही पोलीस निरीक्षक व राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांना स्पष्ट आदेश दिले आहेत. शासन आदेश केवळ फाईलपुरते न राहता, त्याची प्रत्यक्षात कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. अवैध दारू, ताडी, गुटखा पूर्णतः बंद झाला पाहिजे.