Pune District : खडकवासला आवर्तनाबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

कळस : खडकवासला कालव्याचे पाणी कळसमधील वितरिकांना न सोडल्यामुळे शेतकर्यांनी थेट मंत्रालय गाठून पाटबंधारे विभागाने दुजाभाव केल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली. खडकवासला कालव्याचे पाणी हे इंदापूर तालुक्याला पिके जळून गेल्यावर येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे कालव्यावर अवलंबून असणार्या शेतकर्यांचे नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
इंदापूर तालुक्याच्या नावाखाली देण्यात आलेले आवर्तन पाटबंधारे विभागाचे अधिकारी पुण्यासह बारामती, दौंड तालुक्यांना विकत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कळसच्या शेतकर्यांना जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवल्याचा तसेच खडकवासला कालव्याचे आवर्तन सुटल्यानंतर महावितरण कंपनीने वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
खडकवासला कालव्याचे पाणी इंदापूर तालुक्यात आल्यानंतर खासगी यंत्रणेच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून शेतकर्यांना त्रास देण्याचे काम पाटबंधारे विभागाने सुरू केल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी घाबरले आहेत. याबाबत त्यांनी आंदोलनाची तयारी केली आहे. यावर तात्काळ तोडगा काढण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात. या निवेदनावर कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबा महाराज खारतोडे, शिवसेनेचे दत्तात्रय खारतोडे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे विलास खारतोडे, बळीराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय गावडे यांच्या स्वाक्षर्या आहेत.
टेल टू हेड पाणी मिळावे
इंदापूर तालुक्याला टेल टू हेड पाणी मिळण्याची गरज आहे. वितरिका व चार्यांची दुरुस्ती करणे आणि रब्बी व उन्हाळी हंगामात तीन आवर्तने देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.





