पुणे जिल्हा : दिवाळीनिमित्त बेलसर परिसरात आ.बेनकेंचा गावभेट दौरा

नारायणगाव – जुन्नर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अतुल बेनके गाव भेट दौरे करीत असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या मावळ पट्ट्यात बेनके यांनी गुरुवारी (दि.३१) बेलसर, आमलेवाडी, दत्त मंदिर आश्रम, राळेगण, काठेवाडी, बोऱ्हाडेवाडी, वाघेवाडी, भिवाडे, हातवीज, आंबे, पिंपरवाडी, सुकाळवेढे, जावळेवाडी, हिवरेपठार गावातील वाडी वस्त्यांवर जाऊन गावभेट दौरे करून मतदारांची भेट घेतली. यावेळी आदिवासी बांधवांनी बेनके यांचे उत्स्फूर्त स्वागत करून जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगितले. यावेळी बेनके यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
आमदार अतुल बेनके यांनी मागील पंचवार्षिक काळात आदिवासी भागात केलेल्या रस्ते, पाणी आदी आदिवासींच्या विकासाची कामे प्रगतीची नांदी ठरली असल्याची भावना अनेकांनी गावभेट दौऱ्यात बोलून दाखवली. जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील रस्ते चांगले झाले आहे. त्यामुळे शेतात पिकविलेल्या शेतमालाला शहाराची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने आदिवासी बांधवांनी आनंद व्यक्त केला. आदिवासींच्या मूलभूत गरजा व समस्या सोडविण्यासाठी त्या भागातील जनतेने सांगितलेली कामे प्राधान्य क्रमाने पूर्ण केली असल्याचे बेनके यांनी सांगितले.
आ.बेनके यांनी स्वातंत्र्यापासून जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यात वीज नसलेल्या ग्रामीण भागातील वाड्या रस्त्यांवर वीज पोहोचविण्याचे काम केले. रस्ते, शाळेच्या इमारती, पेयजल योजनेतून पिण्याच्या पाण्याची सोय केली. फडके बंधाऱ्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर करून बंधाऱ्याची १५ ते २० फूट उंची वाढवली. त्यामुळे आदिवासी वाड्या वस्त्यांना पिण्याचे व शेतीचे पाणी उपलब्ध झाले. घाटघरला २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. जुन्नरच्या पश्चिम भागात ६५ आदिवासी गावे असून त्यांच्या विकासात आमदार अतुल बेनके यांचा सिंहाचा वाटा आहे.जीवधन किल्ला, सातवाहन कालीन नाणेघाट, हडसर, हनुमंतगड यांच्या पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी वर्ग करण्यात आला आहे.
– पोपट रावते, आदिवासी कार्यकर्ता, घाटघर (जुन्नर)





