पुणे जिल्हा : राजगुरूनगरातील कापड शिलाई दुकान खाक

बेंद्रे यांचा रोजीरोटीचा आधार हिरावला : कपडे, मशिनसह कागदपत्रे जळाली
राजगुरूनगर – शहराच्या मुख्य बाजारपेठेतील बेंद्रे बंधूंच्या कापड शिलाई दुकानाला रविवारी (दि.1) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दुकानातील जुने-नवे कपडे, शिलाई मशीनसह लाकडी साहित्य, कागदपत्र जळून खाक झाले. याबाबतचा पंचनामा तलाठी अधिकार्यांनी केला आहे.
राजगुरूनगर शहरातील मुख्य बाजारपेठेतील मशिदीसमोर बेंद्रे यांचे मंगलोरी कौलांचे व लाकडी बाधंणी असलेले शिलाई मशिनचे दुकान होते. यात जुन्या नवीन कपड्यांचे अल्टर शिलाई करून स्व. दत्ता बेंद्रे यांचे बंधू श्याम बेंद्रे रोजीरोटी एवढे कमावत होते. रोजीरोटीचा एकमेव आधार असलेले हे दुकान जळून बेचिराख झाले. रोजीरोटीचा एकमेव आधार आगीत जळून खाक झाल्याने बेंद्रे यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. रविवारी (दि.1) बेंद्रे यांच्या बंद दुकानाच्या आतून धुराचे लोट दिसू लागल्याने दुकानात आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले.
बाजारपेठेतील व्यापारी बांधवांनी तात्काळ नगरपरिषदेच्या अग्निशामक कर्मचार्यांना आगीची खबर दिली. दुकानातील जुन्या नवीन कपड्यामुळे आगीचा क्षणार्धात भडका उडाला. अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होईस्तोवर धुराच्या लोटांची जागा आगीच्या उंच ज्वाळांनी घेतली होती. पंधरा मिनिटात अग्निशमन कर्मचार्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जाळून खाक झाले होते. स्थानिक व्यापारी आणि मुस्लीम बांधवासह नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सचिन मधवे, राहुल पिगंळे, मुन्ना शेख, जितेंद्र मधवे, दिलीप ओसवाल, सुरज वाडेकर, प्रविण फाकटकर आदींसह आग विझविण्यासाठी पुढाकार घेतला. अग्निशमक कर्मचार्यांना मदत व सहकार्य केले.
…म्हणून आगीची व्याप्ती एका दुकानापुरती मर्यादित
सुदैवाने आगीची दुर्घटना सकाळच्या वेळेस घडली. ही घटना रात्रीच्या वेळी घडली असती तर आजूबाजूच्या दुकानांना आगीचा तडाखा बसला असता. यात मोठे नुकसान झाले असते. सकाळची वेळ असल्याने आग लागल्याचे लगेच लक्षात आले. यामुळे आगीची व्याप्ती एका दुकानापुरती मर्यादित राहिली. दुकानाला आग कशी लागली याबाबत पोलीस आणि नगरपरिषदेचे अधिकारी तपास करीत आहेत.





