Pune District : भोरमध्ये रंगला भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा

भोर : भोर एस टी आगाराला नवीन पाच बसेस मिळाल्या. शुक्रवारी दि. ६ रोजी झालेल्या बस लोकार्पण सोहळ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगल्याचे समोर आले. माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सकाळी आठ वाजताच बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न केला. तर, आमदार शंकर मांडेकर यांनी अकरा वाजता हाच कार्यक्रम सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत साजरा करून या श्रेयवादाला तोंड फोडले.
यावेळी आमदार शंकर मांडेकर यांनी चक्क एसटीच्या कर्मचाऱ्यांसह भोर आगार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळापर्यंत प्रवासाचा आनंद लुटला. यावेळी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, भोर नगरपालिकेचे माजी नगरसेवक केदार देशपांडे, भोलावडेचे सरपंच प्रवीण जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार शंकर मांडेकर म्हणाले, या पाच बसेस मंजुरीसाठी मी प्रयत्न केले असून माजी आमदार संग्राम थोपटे यांचा याच्याशी काही संबंध नसून ते युती सरकारमध्ये निवडणुकीनंतर दाखल झाले आहेत. त्यांच्या काळात त्यांनी जरी प्रस्ताव दिला असला तरी या बसेस मंजूर करण्याचे काम आम्ही केले. भोर आगाराला आणखी पाच नवीन बसेस थोड्या दिवसांमध्ये दिल्या जाणार, तर पुणे आगाराला पाच इलेक्ट्रिकल बसेस देण्यात येणार आहेत.
भोर शहराच्या वैभवात वाढीचा प्रयत्न करणार
नजीकच्या काळात भोरच्या प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी कायम प्रयत्नवादी राहणार असून भोरच्या वैभवात वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून छत्रपतींच्या या भूमीत भोर शहर आणि तालुक्याला पूर्व वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच भोर शहरासाठी येत्या सहा महिन्यांमध्ये २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून भविष्यामध्ये तीस कोटीचा निधी मंजूर करून भोरच्या विकासाला गती देणार असल्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.





