Pune District : कोरेगाव मूळ येथे उड्डाणपुलाची नागरिकांना प्रतिक्षा

सोरतापवाडी : कोरेगाव मूळ येथील प्रलंबित रेल्वे उड्डाणपूल कधी होणार, याकडे पूर्व हवेलीतील नागरिकांचे लक्ष लागले असून याबाबत खासदार अमोल कोल्हे यांना निवेदन देऊन लक्ष घालण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
माजी सरपंच विठ्ठल शितोळे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय काकडे, माजी उपसरपंच लोकेश कानकाटे व सामाजिक कार्यकर्ते सचिन कड यांनी माहिती दिली की, कोरेगाव मूळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातून राज्यमार्ग क्र. 117 जात असून त्या रस्त्याला पुणे-सोलापूर लोहमार्गावर रेल्वे गेट क्र. 8 वर 2018 साली उड्डाणपूल मंजूर झाला आहे.
पुलाचे कामदेखील सुरु करण्यात आले होते; मात्र काही कारणास्तव पुलाचे काम बंद पडले आहे. त्यामुळे कोरेगावमूळ गावातील व आसपासच्या 25 ते 30 गावांना या रस्त्यावरून रेल्वेगेट मार्गाने वाहतूक करावी लागते. रेल्वे गाड्याची सतत ये जा असल्याने रेल्वे गेट बंद असल्यामुळे बर्याच वेळ गेटवर थांबावे लागते. त्यामध्ये शाळा कॉलेजचे विद्यार्थी, शेतकरी वर्ग, नोकरदार, व्यावसायिक व गावाशेजारी प्रयागधाम चॅरिटेबल हॉस्पिटल असल्याने तिथे देशातून व राज्यातून रुग्ण येत आहेत.
रुग्णांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणा-या रुग्णवाहिकेस रेल्वे गेट बंद असल्याने वेळेअभावी बर्याचशा रुग्णांना त्रास होत आहे. गावातील स्मशानभूमी मुळा-मुठा नदीच्या कडेला असल्याने रेल्वे मार्गा पलीकडे कुटुंबातील अंत्यविधीच्या कार्यक्रमाच्या वेळी रेल्वे गेटवर बर्याच वेळ थांबावे लागत आहे. त्यामुळे काही कुटुंबाकडे स्वमालकीची जागा असल्याने ते अंत्यविधी त्यांच्या स्वतःच्या जागेत करावे लागत आहे.
मात्र ज्या कुटुंबांना जागा नाही, अशा कुटुंबांना गावात आल्याशिवाय पर्याय नाही. तसेच राज्यमार्ग क्र. 117 चे रुंदीकरण व नवीन रस्ता करण्याचे काम देखील जवळजवळ झाले आहे. त्यामुळे वाहतूकचे प्रमाण वाढले असून येथील गेट उघडले की, वाहनचालक वाहने कशीपण पुढे नेत असल्याने सतत वाहतूक कोंडी होत आहे.
खासदारांनी लक्ष घालावे
या पुलाचे काम मंजूर असूनदेखील हे काम होत नाही व या विषयांबाबत सरकारकडे पाठपुरावा करून देखील उपयोग झाला नाही. व या भागातील गावांना न्याय मिळाला नाही. काही थोड्याशा लोकांच्या जमिनी या पुलाच्या कामासाठी जात असून त्यांचाच विरोध या पुलाला आहे. पण लाखो नागरिकांच्या दळणवळणाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. म्हणून खासदार कोल्हे यांनी या विषयात लक्ष देऊन आमचा प्रलंबित प्रश्न सोडवावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोरेगाव मूळ ः येथील रेल्वे गेटवर झालेली वाहतूक कोंडी.





