Pune District : मुलांना आवडणार्या वस्तू महाग ; शैक्षणिक साहित्यात 30 ते 40 टक्के वाढ

रांजणी – यावर्षी सीबीएसई शाळा 16 जूनपासून तर 23 जूनपासून शासकीय तसेच अनुदानित, विनाअनुदानित शाळा सुरु होणार आहे. पण यंदा विद्यार्थ्यांच्या शालेय वस्तू खरेदी करताना पालकांची दमछाक होणार आहे. गेल्यावर्षी साधारणपणे 350 ते 400 रुपयांमध्ये मिळणारा वह्यांचा संच यंदा 500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. स्कूल बॅगच्या किमतीही वाढल्या आहेत. फॅशनेबल बॅग्जच्या किमतीमध्येही वाढ झाली आहे. वॉटर बॉटल्स 60 ते 80 रुपयांवरून 150 रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत. वाहतूक खर्चात वाढ झाल्याने साहित्य महागल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे कच्च्या कागदाच्या मालाचे भाव वाढल्याने शिक्षण साहित्यात 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. साहित्यात झालेल्या भाव वाढीमुळे पालकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. बाजारात नवनवीन नोटबुकसह विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. शालेय साहित्याबरोबरच मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे साहित्य देखील दाखल झाले आहे.
ग्रामीण भागातील आठवडे बाजारामध्येही शैक्षणिक साहित्य विक्रीस असून, पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विक्रीत विविध कंपन्यांची रस्सीखेच असून दर्जेदार सहित्यास ग्राहक आकर्षित होत असल्याचं चित्र बाजारात पाहायला मिळत आहे. नोटबुक कंपासपेटी, नोट पॅड, लहान मुलांना वापरात असलेली पाटी, पेन, दप्तर, अंकलिपी या वस्तूंना वाढती मागणी असल्याचे व्यापारी सांगतात. जरी शाळेत पुस्तके मोफत मिळणार असली तरी वह्यांचे नानाविध प्रकार बाजारात आले आहेत. बदलत्या काळानुसार मुलांना आवडणार्या वस्तू देखील महाग झाल्या आहेत.
ब्रॅण्डेड दप्तरांना मागणी
अभिनेता, निसर्गरम्य चित्र, फुले पक्षी, प्राणी, कार्टुन या छायाचित्रांसह बहुरंगी वह्यांना मुलांची प्रत्येकवर्षी अधिक पसंती असते. गेल्या वर्षीपेक्षा यंदा शैक्षणिक साहित्यात दरवाढ झाली असून, पालकांमध्ये नाराजी आहे. परंतु, बालकांच्या मनाप्रमाणे साहित्य विक्रीस उपलब्ध असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. तर, शालेय साहित्यात भाववाढ झाली आहे.मात्र, मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून साहित्य घ्यावेचं लागेल असंही पालक म्हणत आहेत.यंदा बाजारात सुपरहिरो, विविध कार्टून थीम्स, वॉटरप्रूफ कापडांची आकर्षक बॅग विक्रीस उपलब्ध आहेत. ब्रॅण्डेड बॅग्जना मागणी अधिक असून त्यांचे दरही हजार रुपयांपर्यंत पोहचले आहे.
दरवर्षीच नवीन पुस्तके
पूर्वी विद्यार्थी जुने पुस्तक खरेदी करीत होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होत होती. आता शासकीय शाळांमध्ये मोफत पुस्तक मिळत असले तरी विविध इंग्रजी शाळांमध्ये दरवर्षी शाळांमधून नवीन पुस्तक पालकांना घ्यावी लागतात. अनेकवेळा अभ्यासक्रम बदलला नसला तरी काही शाळांमध्ये नवीन पुस्तक घेण्याची जणू सक्तीच केली जात असल्याचे दिसून येते. शैक्षणिक साहित्य महागली असली तरी सर्वसामान्यांना परवडणार्या दरातही उपलब्ध आहेत. शैक्षणिक साहित्यांचा कच्चा माल व वाहत खर्च वाढल्याने दर थोडे वाढले असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मात्र याचा आर्थिक भार सामान्य पालकांवर पडत आहे त्यामुळे किमती कमी करण्याची मागणी केली जात आहे.
पुस्तक, गणवेश मोफत
शासकीय शाळा, अनुदानित, विना अनुदानित शाळांतील आठव्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तक, बुट, पायमोजे मोफत दिल्या जाते. या शाळांतील विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. मात्र मागील काही वर्षात पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळला आहे.





