पुणे जिल्हा : पुरंदरमध्ये बाल विवाह मुक्त भारतला सुरुवात

बाल विवाह रोखण्यासाठी परिंचेत प्रभातफेरी
परिंचे – पुरंदर तालुक्यातील परिंचे येथे कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (सीसीडीटी) संस्था व परिंचे ग्रामपंचायतीच्या व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बाल विवाह मुक्त भारत अभियानाला प्रभातफेरी काढून सुरुवात करण्यात आली असल्याचे सरपंच अर्चना राऊत यांनी सांगितले असून अभियानाच्या निमित्ताने ग्रामसभा घेण्यात आली असल्याचे सांगितले आहे. यावेळी प्रकल्प अधिकारी धनराज खरे, ग्रामसेवक शशांक सावंत उपस्थित होते. प्रभात फेरीत ग्रामस्थ, महिला व किशोरवयीन मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
कर्मवीर विद्यालयाच्या प्रांगणात ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी बाल विवाह होऊ नयेत म्हणून प्रतिज्ञा घेऊन प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली. यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांनी सहभाग घेतला बाल विवाह रोखण्यासाठी घोषणा देत बाजार तळावर जनजागृती करण्यात आली. दक्षिण पुरंदरमध्ये परिंचे, हरणी, माहूर, मांढर, राऊतवाडी या गावांमध्ये प्रभातफेरी, मशाल फेरी, ग्रामसभा, शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा आदी कार्यक्रमांचे आयोजन ग्रामपंचायत व शाळांच्या मदतीने करण्यात आले होते.
25 गावांमध्ये राबविणार अभियान
पुरंदर तालुक्यातील 25 गावांमध्ये 15 ग्रामपंचायत व परिसरातील शाळांना बरोबर घेऊन बाल विवाह मुक्त भारत हे अभियान राबविण्यात येणार आहे. गावपातळीवर शासनाशी निगडित असलेल्या सर्व घटकांना एकत्र करून हे अभियान राबविण्यात येणार्या आहे बाल विवाह रोखण्यासाठी गावातील नागरिक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पोलीस, पोलीस पाटील, कोतवाल एकत्र येत संबंधित व्यक्तीचे सामोपदेशन करीत बालविवाह रोखतील व असे न केल्यास शासनास तक्रार करीत बाल विवाह रोखण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी धनराज खरे यांनी सांगितले आहे.
बालकांच्या हक्कांसाठी विविध उपक्रम
कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (सीसीडीटी) ही जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन या देशभरातील मुलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी काम करणार्या 200 पेक्षा अधिक एनजीओच्या राष्ट्रीय युतीचा एक भाग आहे. भारतातील बालकांच्या हक्कांसाठी अॅक्सेस टू जस्टीस हा प्रकल्प देश पातळीवर राबविला जात आहे. बालविवाह मुक्त भारत या विषयाला अनुसरून प्रकल्पात बालकांच्या हक्कांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये जनजागृती कार्यक्रम राबविले जात असल्याचे प्रकल्प प्रमुख दिलीप त्रिपाठी यांनी सांगितले आहे.





