पुणे जिल्हा : छत्रपती साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन

भवानीनगर – भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024-25चे हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे वर्क्स मॅनेजर विकास क्षीरसागर व त्यांच्या सुविद्य पत्नी पुनम क्षीरसागर तसेच फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर व त्यांच्या सुविद्य पत्नी स्वाती करवर यांच्या हस्ते तसेच काटापूजन कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव व सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे हस्ते मोळी टाकून गव्हाण पूजन करण्यात आले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव म्हणाले, गळीत हंगाम चालू करण्याच्या दृष्टीने कारखान्याकडून सर्व तयारी झाली आहे. यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 21,481 एकर ऊस गळीतास उपलब्ध असून त्याद्वारे अंदाजे 8 लाख मे. टन ऊस गळीतास उपलब्ध होण्याचे अनुमानित आहे व कार्यक्षेत्राबाहेरील 3 लाख मे. टन गेटकेन ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. असे एकूण 11 लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्धीष्ट ठेवले आहे व हे उद्दीष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने दैनंदिन 9,500 ते 10,000 मे. टन उसाचा पुरवठा होईल, असे ऊसतोड वाहतुकीचे नियोजन केले आहे. यावर्षी सर्वच साखर कारखांन्याना उसाची कमतरता जाणवणार आहे. कारखान्याचे गाळप जास्त झाले तर उत्पन्नात वाढ होऊन परटन उत्पादन खर्च कमी होईल.
कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे म्हणाले, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 86032 व इतर उच्च साखर उतारा देणार्या ऊस जातीची लागवड वाढणेसाठी गेल्या 4 वर्षापासून प्रयत्न करण्यांत येत आहेत. कारखान्याचे कार्यक्षेत्रात 86032 या व्हरायटीचे ऊस क्षेत्र वाढले आहे. त्याचा निश्चित फायदा साखर उतारा वाढण्यामध्ये होणार आहे. यावर्षी ऊसाचे चांगले गाळप झाले तर कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे. तेव्हा ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद सर्व अधिकारी व कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व ऊस तोडणी मजूर यांनी ज्या पद्धतीने आजपर्यंत सहकार्य केले त्याचप्रकारचे सहकार्य येथून पुढे हा गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकळ, तानाजीराव थोरात, विशाल निंबाळकर, अमरसिंह कदम, प्रशांत पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवराज रणवरे यांनी केले व कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास संचालक बाळासाहेब पाटील, दत्तात्रय सपकळ, राजेंद्र गावडे, संतोष ढवाण, सर्जेराव जामदार, नारायण कोळेकर, बाळासाहेब सपकळ, रसिक सरक, निवृत्ती सोनवणे आदी संचालक तसेच श्री छत्रपति शिक्षण संस्थेचे माजी सदस्य, शिवाजीराव रुपनवर, अमोल भोईटे वसंत जगताप व बहुसंख्य सभासद, अधिकारी, कर्मचारी व ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते.
भवानीनगर ः श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन पार पडला.





