पुणे जिल्हा : जुन्नरमध्ये परिवर्तन की सत्ताधा-यांनाच संधी?

मतदारसंघात पंचरंगी लढतीमुळे अंदाज लावणे कठीण
नारायणगाव – जुन्नर विधानसभा मतदारसंघात चुरशीची निवडणूक झाली असून भल्याभल्यांना निवडणुकीत कोण विजयी होणार याचा अंदाज येत नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला आपलाच उमेदवार विजयी होईल, अशी खात्री वाटत असल्याने आनंदासह सुप्तपणे चिंतेचे वातावरण आहे. मतदारसंघात महायुतीचे अतुल बेनके, महाविकास आघाडीचे सत्यशील शेरकर, अपक्ष शरद सोनवणे, आशा बुचके, वंचित आघाडीचे देवराम लांडे यांच्यात मुख्य लढत असल्याने शनिवारी (दि.23) जाहीर होणार्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, परिवर्तन होणार की सत्ताधा-यांनाच संधी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
महायुतीचे उमेदवार आमदार अतुल बेनके यांनी संपूर्ण प्रचारात तालुक्यातील विकासकामे व भविष्यातील जुन्नर तालुक्याच्या विकास योजना सांगून आघाडी घेतली होती. शिवाय लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या महिलांचा वाढता पाठिंबा बेनके यांच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील महिलांचे वाढलेले मतदान उमेदवार अतुल बेनके यांना विजयाकडे घेऊन जाणार असल्याचे समर्थक बोलत आहे.
महाविकास आघाडीचे सत्यशील शेरकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरुवातीचे चार ते पाच दिवस ठाकरे गटाच्या शिवसेनेने पाठिंबा न दिल्याने प्रचारासाठी संधी मिळाली नाही. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच निवडणुकीसाठी इच्छुक असलेले शरद लेंडे, मोहित ढमाले यांनी एकत्रित येऊन सत्यशील शेरकर यांच्या प्रचाराची आघाडी सांभाळली. त्यामुळे महाविकास आघाडीचे समर्थक कार्यकर्ते सत्यशील शेरकर यांच्याच विजयाचा दावा करीत आहे.
माजी आमदार व अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनीही जोमाने प्रचार करून जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीत तगडे आव्हान उभे केल्याने भल्याभल्यांना निवडणुकीच्या निकालाचा अंदाज येत नाही. याशिवाय अपक्ष उमेदवार आशा बुचके व देवराम लांडे यांनीही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतल्याने त्यांच्या पारड्यात किती मते पडतात यावर इतर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
वाढलेली टक्केवारी कोणाच्या पारड्यात
जुन्नर विधानसभा 2019 च्या निवडणुकीत 58.1 टक्के मतदान झाले होते; परंतु 2024 च्या निवडणुकीत 3 लाख 25 हजार 764 पैकी 2 लाख 24 हजार 585 (68.94 टक्के) इतके वाढीव मतदान झाले आहे. त्यामुळे 2019 च्या तुलनेत 10.78 टक्के वाढलेले मतदान जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी आमदारकीच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार हे ठरवणार आहे.
लाडकी बहीण ठरवणार आमदार
जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानापैकी पुरुष 1 लाख 18 हजार 45 तर महिलांचे 1 लाख 6 हजार 536 इतके मतदान झाले आहे. त्यामुळे जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजना जुन्नर तालुक्याचा आमदार कोण होणार हे ठरवणार आहे.
बेनके यांचा विजय निश्चित – पांडुरंग पवार
जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार अतुल बेनके यांचा विजय निश्चित असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी सांगितले आहे. आमदार बेनके यांनी तालुक्यात केलेली विकासकामे, शेतकर्यांची वीज बिल माफी, वाडी वस्तीवर झालेले रस्ते, दिव्यांगांसाठी व रुग्णांसाठी केलेली कामे, लाडकी बहीण योजना आदी कामांमुळे सर्वसामान्य जनता बेनके यांच्या पाठीशी होती. प्रत्येक गावात मतदान प्रक्रियेत अतुल बेनके एक नंबर अथवा दोन नंबर असून लाडकी बहीण योजना अतुल बेनके यांना विजयाकडे घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





